आजच्या नव्या जगातल्या मुली व महिलांच्या द़ृष्टीने करिअरसाठीचं एक क्षेत्र म्हणजे पोषण आणि आहारशास्त्र. आता कुणी म्हणेल, छे! खाण्यापिण्यात काय शिकायचं? पण असा विचार करणं हे काही खरं नाही. आहार आणि पोषण हे एक बहुविकसित असं शास्त्र आहे, यात गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या अंगाने संशोधन झालं आहे. ( Nutritional Diet )
संबंधित बातम्या
मानवी जीवनासाठी हे शास्त्र कसं वापरायचं हे अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शिकण्याची, त्यातलं प्रशिक्षण घेण्याची सोय आता उपलब्ध आहे, हे विशेष. या विषयातलं शिक्षण, प्रशिक्षण घेणार्या व्यक्तींना भारतात तसंच परदेशातही नोकरी-व्यवसायाची संधी मिळू शकते.
पोषण आणि आहारशास्त्राची व्याप्ती विविध उद्योग आणि क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे. अनेक विद्यापीठांमध्ये बारावीनंतर आहारतज्ज्ञ अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर करता येण्याजोगे पोषण आणि आहारशास्त्र या विषयातील सर्टिफिकेट व डिप्लोमा अभ्यासक्रमही काही शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध आहेत.
असं शिक्षण, प्रशिक्षण उत्तम गुणवत्तेने पूर्ण झाल्यावर हॉस्पिटल्स, हॉटेल्स, नर्सिंग होम, क्रीडा संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, कारखाने, स्पा तसेच पुनर्वसन केंद्रे आणि सरकारी आरोग्य विभागातही नोकरी मिळू शकते. जर नोकरी करायची नसेल, तर आपले स्वत:चं क्लिनिक सुरू करून पोषण-आहारतज्ज्ञ या नात्याने कन्सल्टन्सीदेखील देता येते. ( Nutritional Diet )