Latest

प्रेक्षकांसाठी गुड न्युज : आता लवकरच मल्टिप्लेक्स चित्रपटाचे तिकीट मिळणार १०० रुपयांत

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क: तुम्हाला मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता तुम्हाला मल्टिप्लेक्स सिनेमा हॉलचे तिकीट फक्त 100 रुपयांमध्ये मिळू शकते. बॉलीवूड चित्रपटांच्या सततच्या अपयशाने यंदा थिएटर मालक, चित्रपट निर्माते आणि वितरकांची चिंता वाढवली आहे. यावर्षी चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवल्याने थिएटर चालक आता स्वस्त तिकीट देऊन प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या विचारात आहेत.

गेल्या महिन्यात, राष्ट्रीय सिनेमा दिनी, तिकिटाची किंमत 75 रुपये असताना 60 लाखांहून अधिक लोक सिनेमागृहात पोहोचले. त्यामुळे आता स्वस्तात चित्रपटाची तिकिटे देण्याचे नियोजन सुरू आहे. चित्रपट विश्लेषकांचे म्हणणे आहे की मल्टिप्लेक्समध्ये सिनेमाच्या तिकिटांची किंमत आता 350-450 रुपये किंवा त्याहून अधिक आहे, जे शोच्या वेळा आणि इतर घटकांवर अवलंबून असून सामान्य ग्राहकांसाठी इतकी महाग तिकिटे खरेदी करणे खूप कठीण आहे.

आगामी चित्रपटांसाठी तिकिटे स्वस्त
थिएटर ऑपरेटर आणि वितरक आगामी चित्रपटांसाठी कमी आणि मध्यम बजेट चित्रपटाची तिकिटे स्वस्त करू शकतात. तसेच संध्याकाळ आणि रात्रीच्या शोची तिकिटे माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्याच वेळी, बहुतेक तरुणांना आकर्षित करण्यासाठी, वीकेंडला देखील अशा ऑफर देण्याची योजना आहे.

तिकिटांवर 50 टक्के सवलत, स्नॅक्सची किंमतही होणार कमी
सिनेमागृहांमधील महागड्या स्नॅक्सबाबत ग्राहकांच्या तक्रारींनंतर खाद्यपदार्थ आणि पेयांच्या किमतीतही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे . प्रयोग म्हणून गेल्या आठवड्यात ब्रह्मास्त्र आणि चुप या चित्रपटांची तिकिटे १०० रुपयांना विकली गेली. आता अजय देवगणचा 'दृश्यम' हा चित्रपट २ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे आणि त्यासाठी २ ऑक्टोबरपासून ओपनिंग डे तिकिटांवर ५० टक्के सूट देण्यात आली आहे. अमिताभ बच्चन स्टारर गुडबाय हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाला 150 रुपयांचे तिकीट मिळत आहे.

आयनॉक्स लीझरचे मुख्य प्रोग्रामिंग ऑफिसर राजेंद्र सिंह ग्याला म्हणतात की, "आम्ही थोडा वेळ घेऊ आणि तिकिटांच्या किमती कमी झाल्यावर सिनेमामध्ये प्रेक्षकांची संख्या प्रत्यक्षात वाढतेय का याचे विश्लेषण करू. वास्तविक पाहता, मोठ्या बजेटच्या चित्रपटांसाठी हे करणे शक्य नाही. कारण तिकिटांचे दर खूपच कमी असताना ते त्यांचा खर्च वसूल करू शकत नाहीत. ऑक्टोबरमध्ये येणार्‍या छोट्या चित्रपटांना तिकिटांच्या कमी किमतीचा नक्कीच फायदा होऊ शकतो."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT