पुणे, पुढारी वृत्तसेवा: एखादी दस्तनोंदणी केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर फेरफार उतार्यावर नोंद घेण्यासाठी तो दस्त पाठविण्यात आला असल्याचा मेसेज आला. त्यानंतर फेरफार उतार्यावर त्यांची नोंद घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. परंतु, आता त्याची गरज नाही. खरेदीखत झाल्यानंतर पंधरा दिवसांनी तुम्ही कोणत्या दस्तनोंदणी कार्यालयात दस्तनोंदणी केली, त्या कार्यालयाचे नाव अथवा ठिकाण आणि तुमचा दस्त क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या नावाचा फेरफार धरला गेला आहे की नाही, त्यावर काही हरकत आली आहे का, याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
भूमिअभिलेख विभागाने 'महाभूमी' पोर्टलवर नागरिकांच्या सेवेसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 'म्युटेशन अॅप्लिकेशन स्टेटस' म्हणजे फेरफार अर्जाची सद्य:स्थिती या नावाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा वापर करून जमिनीची दस्तनोंदणी झाल्यानंतर फेरफार आणि सातबारा उतारा होईपर्यंतच्या सर्व गोष्टी ट्रॅक करता येणार आहेत. त्यासाठी ऑफिसला सुटी टाकण्याची अथवा सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही.
दस्तनोंदणी झाल्यानंतर ऑनलाइनच्या माध्यमातून संबंधित जमिनीच्या सातबारा आणि फेरफार उतार्यामध्ये नोंद घेणार्या 'ई-फेरफार' योजना भूमिअभिलेख विभागाने सुरू केली आहे. राज्यात सर्वत्र या योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीचा अथवा जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर केवळ काही दिवसांत ऑनलाइन फेरफारची नोंद घातली जात आहे. भूमिअभिलेख विभागाने विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन देण्यावर भर दिला आहे. यापूर्वी जमिनींच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यावर खरेदीदाराची सातबारा उतार्यावर नोंद होण्यासाठी आणलेल्या या ई-फेरफार योजनेत आणखी एक पर्याय नव्याने उपलब्ध करून देण्यात आला आहे.