गतवेळी भाजप आणि एकसंध शिवसेनेने विजयपताका फडकविलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व सहा मतदारसंघांत यावेळी मात्र चुरशीच्या लढती होणार असल्याची शक्यता गडद आहे. येनकेनप्रकारे गेल्या वेळच्या जागा कायम राखण्याचा महायुतीचा निर्धार आहे; तर केंद्र आणि राज्य सरकारांच्या कारकिर्दीचा पाढा वाचत सत्ताधार्यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने ऐक्याची वज्रमूठ
आवळली आहे.
उत्तर महाराष्ट्रात एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकी नाशिक शिवसेनेच्या शिंदे गटाकडे तर दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर हे मतदारसंघ गेल्यावेळी भाजपकडे होते. सद्य:स्थितीत नाशिकची जागा शिवसेना शिंदे गट लढण्याची शक्यता आहे तर उर्वरित पाच ठिकाणी भाजपने आपल्या शिलेदारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमधील गोंधळ संपलेला नाही. लवकरच प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होऊ शकते.
2019 मधील निवडणुकीत नाशिक मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीच्या हेमंत गोडसे यांनी काँग्रेस आघाडीच्या समीर भुजबळ यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव करीत विजयी मोहोर उमटवली होती. यावेळी दुभंगलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून गोडसे मैदानात राहणार हे निश्चित आहे तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात आहे. शेजारील दिंडोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघात मावळत्या मोदी सरकारमध्ये आरोग्य राज्यमंत्री पद भूषवलेल्या डॉ. भारती पवार पुन्हा नशीब आजमावणार आहेत. गतवेळी डॉ. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महाले यांचा पराभव केला होता. यावेळी डॉ. पवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा गड राहिलेल्या धुळे मतदारसंघात डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना मात देत सलग दुसर्या विजयाची नोंद केली होती. यंदा तिकिटाबाबत अनिश्चिता असूनही पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या डॉ. भामरे यांना महाविकास आघाडीतील काँग्रेससह एमआयएम उमेदवारांचा मुकाबला करण्याची अपिरहार्यता स्वीकारावी लागणार आहे. आदिवासीबहुल नंदुरबारमध्ये भाजपच्या डॉ. हीना गावित तिसर्यांदा मैदानात आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांना अस्मान दाखवले होते. यावेळी पुन्हा या दोहोंतच सामना रंगण्याची दाट शक्यता आहे.
राजकीयद़ृष्ट्या प्रतिष्ठेच्या जळगाव मतदारसंघात 2019 मध्ये भाजपचे उन्मेष पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये उन्मेष पाटील यांनी मोठ्या फरकाने विजयाची नोंद केली होती. यंदा मात्र पाटील यांच्या तिकिटाला कात्री लावत भाजपने स्मिता वाघ यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. वाघ यांच्या समोर शिवसेना ठाकरे गटाच्या ललिता पाटील अथवा डॉ. हर्षल माने यांचे आव्हान उभे ठाकण्याची अटकळ आहे. रावेर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी मागील निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांच्यावर विजय मिळवला होता. यावेळी तिसर्यांदा मैदानात उतरलेल्या रक्षा खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संंतोष चौधरी किंवा रवींद्र पाटील यांचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे.
उपरोक्त सहापैकी चार ठिकाणी भाजपने महिला उमेदवार मैदानात उभे केले आहेत. सत्ताधारी महायुतीने तिकीट वाटपात आघाडी घेतली आहे. विरोधी महाविकास आघाडीत मात्र चर्चेची गुर्हाळं सुरू आहेत. महायुती केंद्र व राज्य सरकारांच्या लोकोपयोगी योजनांच्या आधारे मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करेल तर महाविकास आघाडी दोन्ही सरकारांच्या अपयशावर बोट ठेवत निवडणुकीत रण पेटवण्याची शक्यता असल्याने सर्व लढती चुरशीच्या ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.