पुणे, पुढारी वृत्तसेवा: पेन्शन देता का जाता, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा विविध घोषणा देत महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या शिक्षकेतर कर्मचार्यांनी शनिवार वाडा ते सेंट्रल बिल्डिंग असा आक्रोश मोर्चा काढला. सेंट्रल बिल्डिंगच्या गेटवरच ठिय्या आंदोलन करत सरकारकडे तब्बल 22 मागण्या केल्या असून मागण्या मान्य न झाल्यास दहावी-बारावी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
मोर्चामध्ये कोल्हापूर, सांगली,सातारा, सोलापूर, नंदूरबार आदी जिल्ह्यांमधून साधारण साडेचार ते पाच हजार कर्मचारी सहभागी झाले होते. महामंडळाचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, राज्यअध्यक्ष अनिल माने, राज्य कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सेंट्रल बिल्डिंग येथे मोर्चाचा समारोप झाला. याप्रसंगी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोर्चास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी खांडेकर म्हणाले, शिक्षकेतर कर्मचार्यांतर्फे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला जात असला तरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांना हा इशारा आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर दहावी बारावीच्या परीक्षांचे काम शिक्षकेतर कर्मचारी करणार नाहीत. त्यामुळे परीक्षेत अडचणी आल्यास त्यास राज्य शासन जबाबदार असेल. 2005 पासून शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती बंद आहे. कर्मचारी संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. एकीकडे 75 हजार पदे भरण्याचा आनंद उत्सव चालू असताना शिक्षक व शिक्षकेतर पदांची पदे भरण्याबाबत शासनाला विसर पडलेला आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी 10/20/30 च्या लाभाची योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचार्यांच्या भरतीस त्वरित परवानगी द्यावी. शिक्षकेतरांच्या शिक्षण सेवक मानधनाद्वारे वाढ करावी. आदी 22 मागण्यांचे निवेदन सरकारकडे देण्यात येणार आहे.
शिक्षक आमदार आसगावकर म्हणाले, नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सरकारला लोकांनी पेन्शनवरून जागा दाखवली आहे. कामाचा प्रचंड ताण असल्यामुळे शिक्षकेतर कर्मचार्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता माघार घ्यायची नाही. राज्याचे शिक्षण सहसंचालक हरुण अत्तार व शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चाचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे विनोद गोरे, अध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, कार्याध्यक्ष देवेंद्र पारखे व इतर पदाधिकार्यांनी केले होते.