मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्या भागात रुग्णालय व दवाखाने नाहीत, त्या ठिकाणी 25 जिजाऊ क्लिनिक (प्राथमिक उपचार केंद्र) सुरू करण्यात येणार होते. गेल्या वर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पात या नव्या संकल्पनेची घोषणा करण्यात आली. मात्र, अद्याप एकही क्लिनिक सुरू झालेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्यसेवेबाबत किती गांभीर्याने काम करत आहे, ते स्पष्ट होत आहे.
शहरातील सर्व नागरिकांना घरांजवळ चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पालिकेने दाट लोकवस्ती, झोपडपट्टी व उपनगरात तसेच, ज्या भागांत दवाखाना नाही तेथे जिजाऊ क्लिनिक सुरू करण्याची घोषणा सन 2022-23 च्या अर्थसंकल्पाच्या वेळी केली. त्यासाठी तत्कालिन आयुक्त राजेश पाटील हे विशेष आग्रही होते. पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने स्वखर्चाने ही योजना राबविली जात आहे. त्यासाठी पालिकेचे अधिकार्यांचे एक पथक दिल्ली येथील मोहल्ला क्लिनिक योजना प्रत्यक्ष पाहून आले. त्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरात क्लिनिक उभारले जाणार आहेत. त्यासाठी खासगी डॉक्टर व इतर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जागा ताब्यात नसल्याने तसेच, योग्य जागा उपलब्ध होत नसल्याने क्लिनिकची जागा निश्चित करण्यात बराचसा वेळ जात आहे. क्षेत्रीय अधिकारी त्यांच्या भागांतील जागा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत असल्याने विलंब होत असल्याचे अधिकार्यांचे मत आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात 25 जिजाऊ क्लिनिक उभारण्यात येणार होती. त्यांची घोषणा होऊन वर्ष लोटले तरी, अद्याप एकही क्लिनिक सुरू झालेले नाही. योग्य ठिकाणी जागा उपलब्ध होत नसल्याने क्लिनिक उभारता येत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. वर्षभरात 25 पैकी केवळ 9 जागा आतापर्यंत निश्चित झाल्या आहेत. त्यापैकी केवळ 2 ठिकाणी काम सुरू झाले आहे. उर्वरित ठिकाणी विविध अडचणी असल्याचे काम सुरू झालेले नाही. जागेची अडचण आहे आणि पुरेशी जागा ताब्यात येणार नाही त्या ठिकाणी कंटेनरमध्ये क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन आहे.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) तसेच, थेरगाव, जिजामाता, आकुर्डी व भोसरी या मोठ्या रुग्णालयांवर रूग्णांचा ताण वाढत आहे. तो ताण कमी करण्यासाठी जिजाऊ क्लिनिकची संकल्पना समोर आणण्यात आली. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, किरकोळ जखम असे आजारी रूग्णही वायसीएमसह इतर मोठ्या रूग्णालयांत गर्दी करतात. त्यामुळे डॉक्टरांवरील ताण वाढतो. तो ताण कमी करण्यासाठी आणि घराजवळ प्राथमिक उपचार केंद्र उपलब्ध व्हावे म्हणून जिजाऊ क्लिनिक सुरू केले जाणार आहेत. अधिक उपचाराची गरज असल्यास रूग्णास मोठ्या रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
दोन ठिकाणी काम सुरू
जिजाऊ क्लिनिकसाठी 2 हजार चौरस फुटांची पालिकेची स्वत:ची जागा गरजेची आहे. पहिल्या टप्प्यात 9 ठिकाणच्या जागा निश्चित झाल्या आहेत. तेथे 400 ते 450 चौरस फुट आकाराचे क्लिनिक बांधले जाणार आहे. त्याकरीता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. सहा ठिकाणी काम सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. दिघी व काळेवाडी या दोन ठिकाणी काम सुरू झाले आहे. रावेत व दापोडी येथे लवकरच काम सुरू केले जाईल. तांत्रिक अडचणी दूर करून काम सुरू केले जात आहे, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांनी सांगितले.