टोंक (राजस्थान), वृत्तसंस्था : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने समतामूलक समाजाची निर्मिती देशात व्हावी म्हणून एससी/एसटी वर्गाला दिलेले आरक्षण कधीही संपणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावरच आम्ही पुढे निघालेलो आहोत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासीयांना दिला.
काँग्रेसचे धोरण मात्र नेहमी तुष्टीकरणाचे राहिलेले आहे. त्यासाठीच संविधानाने दलित आणि आदिवासींना दिलेले आरक्षण कमी करून धर्माच्या आधारावर ते मुस्लिमांना देण्याचा घाट काँग्रेसने घातलेला आहे, असा इशाराही पंतप्रधानांनी दिला.
राजस्थानातील उनियारा (टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघ) येथे मंगळवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. पंतप्रधान
पुढे म्हणाले, 2004 मध्ये एससी/एसटींवर अन्याय करणारा असा प्रयोग देशात आधीच झालेला आहे. आंध्र प्रदेशात 2004 मध्ये एससी-एसटींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला. या पायलट प्रोजेक्टनंतर संपूर्ण देशात हेच धोरण राबविण्याची योजनाही आखली गेली होती. परंतु आम्ही मान्य केलेच नसते म्हणून ती यशस्वी होऊ शकली नाही.
काँग्रेसला संविधानाची अजिबात पर्वा नाही. सत्तेत असताना तर काँग्रेस संविधानाच्या बाबतीत अगदीच बेदरकार होती. पुन्हा 2011 मध्ये केंद्रात सत्तेत असताना काँग्रेसने संपूर्ण देशात पुन्हा याच धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. एससी/एसटी प्रवर्गांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याच्या हालचाली काँग्रेसने सुरू केल्या. आम्ही पुन्हा आडवे आलो. आम्ही प्रखर विरोध केला नसता तर एससी/एसटींच्या जागा कमी झाल्याच असत्या आणि वरून काँग्रेससह विरोधक आमच्यावरच संविधानविरोधी असल्याचा आरोप करतात. अरे स्वातंत्र्यानंतर 60 वर्षे उलटायला आली तरी देशातीलच जम्मू-काश्मीर या राज्यात बाबासाहेबांचे संविधान लागू झालेले नव्हते. तेथे एससी/एसटींना आरक्षण नव्हते. आम्ही कलम 370 हटवून बाबासाहेबांचे संविधान काश्मीरमध्ये लागू केले. तेथेही एससी/एसटींना आरक्षण मिळवून दिले. काँग्रेसवर एवढाच विश्वास असेल तर एससी/एसटींच्या आरक्षणात अन्य कुणालाही वाटा देणार नाही, असे वचन या पक्षाकडून देशातील जनतेने घ्यावे, असे जाहीर आव्हान पंतप्रधानांनी दिले. काँग्रेसने तसे वचन दिले तरीही मला ते चालेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
काँग्रेसने कर्नाटक राज्यात एससी आणि एसटीचे आरक्षण कमी करून त्यात घुसडलेला मुस्लिम कोटा आम्ही या राज्यात सत्तेत येताच रद्द केला. एससी/एसटींना संरक्षण दिले. काँग्रेसला त्याचा राग आला.
काँग्रेस जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेते, तेव्हा त्या मतांसाठी सोडलेल्या तोंडच्या वाफा असतात. दुसरीकडे मी आहे. नरेंद्र मोदी! मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कृतिशील पूजा करणारा एक सेवक आहे. म्हणून मी जम्मू-काश्मीरमध्येही त्यांचे संविधान लागू करतो. म्हणून मी एससी/एसटी आरक्षणात इतरांची घुसखोरी करविण्याचा काँग्रेसचा डाव हाणून पाडला. म्हणून मी एका नागरी संहितेची स्वप्ने पाहतो. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्य नसताना केवळ व्होट बँकेच्या राजकारणासाठी धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायला निघालेली, एससी/एसटींवर अन्याय करायला निघालेली काँग्रेसच खर्या अर्थाने संविधानाच्या विरोधात आहे,
काँग्रेसच्या राजवटीत हनुमानचालिसा ऐकणेही गुन्हा ठरतो. कर्नाटकात त्याचे उदाहरण पाहायला मिळाले. एका दुकानदाराला केवळ हनुमानचालिसा ऐकत होता म्हणून मारहाण झाली. राजस्थानातही काँग्रेसची सत्ता असताना रामनवमीच्या मिरवणुकांवर बंदी होती, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
2014 नंतरही सत्तेत काँग्रेस असती तर…
पंतप्रधान म्हणाले, 2014 नंतरही काँग्रेस सत्तेत असती तर सैनिकांना वन रँक वन पेन्शन लागू झाली नसती. माजी सैनिकांना 1 लाख कोटी रुपये मिळाले नसते.
तर सीमेवर जवानांचे रोज शिरच्छेद अन् देशात आज या शहरात, तर उद्या त्या शहरात असे रोज बॉम्बस्फोट झाले असते. निरपराध नागरिक मरत राहिले असते.