मिलिंद कांबळे
पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत चर्होली, बोर्हाडेवाडी व रावेत येथील गृहप्रकल्पांच्या 3 हजार 664 सदनिकांसाठी सोडत काढून दोन वर्षे झाले. महापालिका प्रशासनाच्या संथगती कारभारामुळे अद्याप लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळालेली नाही. परिणामी, सर्वसामान्य कुटुंबांना सध्या राहत असलेल्या घर भाड्यासह नव्या घरासाठीचे घेतलेल्या बँकेचे हप्ते भरताना आर्थिक ओढाताण होत आहे.
रावेत गृहप्रकल्पाचा वाद न्यायालयात सुरू असल्याने अजून तेथे कामच सुरू झालेले नाही. तेथील 934 सदनिका कधी मिळणार हे अधिकार्यांनी सांगता येत नाही. तर, चर्होली व बोर्हाडेवाडी गृहप्रकल्पांतील सर्व 2 हजार 730 सदनिका वर्षभरापूर्वी तयार झाल्या आहेत. तसेच, बहुतांश लाभार्थ्यांनी आपला 90 टक्के स्वहिस्सा पालिकेकडे जमा केला आहे. त्यामुळे लवकरच हक्काचे घर मिळणार, अशी आस लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय अनेक महिन्यांपासून लावून बसले आहेत.
चर्होली येथील सदनिकेसाठी 6 लाख 69 हजार व बोर्हाडेवाडीच्या सदनिकेसाठी 6 लाख 21 हजार स्वहिस्सा रक्कम आहे. बहुतांश लाभार्थ्यांनी अनेक खटाटोप करून बँक कर्ज काढून स्वहिस्सा भरला आहे. त्यामुळे त्यांना बँकेचा हप्ता सुरू झाला आहे. सध्या राहत असलेल्या घराचेही भाडे भरावे लागत आहे. सदनिका मिळत नसल्याने या सर्वसामान्य लाभार्थ्यांची आर्थिक ओढाताण सुरू आहे. सध्याच्या महागाईच्या काळात नव्या घराचे हप्ते भरायचे का सध्याच्या घराचे भाडे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. तसेच, घर खर्च, किराणा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च व इतर खर्च कायम आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण होत असून, घर खर्च कसा चालवायचा असा, सवाल लाभार्थी करीत आहेत.
पंतप्रधान आवास योजनेतील चर्होली व बोर्हाडेवाडी येथील गृहप्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, परिसरातील कामे अजून अपूर्ण आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर तात्काळ सदनिकांचे वितरण करण्याचे नियोजन आहे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमय समोरील उद्यमनगर (370 सदनिका) आणि आकुर्डी (568 सदनिका) येथील गृहप्रकल्पांतील एकूण 938 सदनिकांसाठी लवकरच सोडत काढण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. आरक्षण व रस्ते कामांत बाधित कुटुंबासाठी घरे यासाठी हे दोन गृहप्रकल्प राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने आता आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या सदनिका देण्यात येणार आहेत. प्रयोजनात बदलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहे.
चर्होली, बोर्हाडेवाडी व रावेत येथील एकूण 3 हजार 664 सदनिकांसाठी नागरिकांकडून 5 हजार रुपयांच्या डीडीसह अर्ज भरून घेण्यात आले. त्यात तब्बल 47 हजार 801 अर्जदार पात्र ठरले. घरांची 11 जानेवारी 2021 ला ठरलेली सोडत अचानक रद्द करण्यात आली. त्यावरून महापौरांसह सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्त दालनाबाहेर धरणे आंदोलन केले. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर 27 एप्रिल 2021 ला कोणताही गाजावाजा न करता सोडत काढण्यात आली. सोडतीनंतर लाभार्थी, प्रतीक्षा यादी क्रमांक एक व दोन असा याद्या तयार करण्यात आल्या. सोडत काढून 2 वर्षे झाले आहेत.