पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेत आज (दि.८) अविश्वास प्रस्तावावर चर्चेला प्रारंभ झाला. काँग्रेसच्या वतीने गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात केली. आज मणिपूर न्याय मागत आहे. अशावेळी पंतप्रधान माेदी कुठं आहेत, असा सवाल करत मणिपूरची समस्या ही भारताची समस्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत का हटवले नाही, त्यांनी मणिपूरवर मौन व्रत का ठेवले आहे. असे सवाल करत त्यांनी मौन साेडावे यासाठी आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणावा लागला, असे खासदार गोगोई यांनी सांगितले.
अविश्वास ठरावाच्या सुरूवातीलाच काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या विधानामुळे गदारोळ झाला. ते म्हणाले की, "पंतप्रधानांनी संसदेत न बोलण्यासाठी 'मौन व्रत' घेतले आहे. त्यामुळे त्यांचे मौन तोडण्यासाठी आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणावा लागला. त्यांच्यासाठी आमचे तीन प्रश्न आहेत. पंतप्रधानांनी मणिपूरला आजपर्यंत भेट का दिली नाही? मणिपूरवर बोलायला ८० दिवस का लागले? मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री पदावरून का हटवले नाही? असे सवाल त्यांनी केले आहेत.
काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, "आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्यास भाग पाडले आहे. हा प्रस्ताव कधीच संख्येबद्दल नव्हता तर मणिपूरच्या न्यायासाठी होता. मी हा प्रस्ताव मांडतो की या सभागृहाने सरकारवर अविश्वास व्यक्त केला आहे. I.N.D.I.A. ने मणिपूरसाठी हा प्रस्ताव आणला आहे. मणिपूरला न्याय हवा आहे. मणिपूर जळतोय म्हणजे भारत जळतोय. मणिपुरची समस्या ही भारताची समस्या आहे. मणिपूरमधील स्थिती अभूतपूर्व आहे. इतका संताप आधी कधीच पाहिला नाही, असे गौरव गोगोई यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांना हे मान्य करावे लागेल की त्यांचे डबल इंजिन सरकार, त्यांचे मणिपूरमधील सरकार अपयशी ठरले आहे. म्हणूनच मणिपूरमध्ये १५० लोकांचा मृत्यू झाला, सुमारे ५ हजार घरे जाळली गेली, सुमारे ६० हजार लोक मदत शिबिरात आहेत आणि जवळपास ६ हजार ५०० एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, ज्यांनी चर्चेचे, शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला हवे होते, त्यांनी गेल्या २- ३ दिवसांत समाजात तणाव निर्माण करणारी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्र्यांनी संवादाचे वातावरण निर्माण करावे मात्र त्यांनी उचललेल्या पावलांमुळे समाजात तणाव वाढला आहे.