राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : इंडिया आघाडीत फूट पडलेली नाही. मात्र, नितीश कुमारांची भाजपबरोबर जाण्याची भूमिका धक्कादायक असल्याचे स्पष्ट मत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. राजगुरुनगर येथे साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत मंगळवारी (दि. 30) 'छत्रपती शिवाजी महाराज : काल, आज आणि उद्या' या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कोल्हे बोलत होते. सध्याची राजकीय स्थिती विचारात घेता राजकारणात काहीही घडू शकते. मग आपण येणार्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार म्हणून समोर येईल का?
असे विचारता, डॉ कोल्हे यांनी भूमिका लवकर स्पष्ट केली नाही. मात्र, वारंवार पाठपुरावा केल्यावर खासदार शरद पवार 'सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण' असे सांगत विषयांतर केले. राम मंदिर लोकार्पण, मराठा आरक्षण आंदोलन, यावर थेट आक्षेप न घेता ते म्हणाले, या घटना घडल्या म्हणजे शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या हातात काही पडणार नाही. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, संचालक हिरामण सातकर, बाळासाहेब सांडभोर, अॅड. राजमाला बुट्टे पाटील, प्रबंधक कैलास पाचारणे, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, प्रा. डॉ. संजय शिंदे आदी मान्यवर, विद्यार्थी, ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.