पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची (INDIA Alliance) फारशी प्रगती झालेली नाही, अशी कबुली देत काँग्रेस पक्षाला पाच विधानसभा निवडणुकांमध्येच जास्त रस असल्यचे दिसते. इंडिया आघाडीमध्ये आपण सर्वांनी काँग्रेसला प्रमुख भूमिका देण्याचे मान्य केले होते;परंतू सध्या तरी निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेस उत्तर देतील आणि पुढील बैठक बोलवतील, अशा शब्दांमध्ये इंडिया आघाडीचे निमंत्रक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडीच्या प्रगतीवर भाष्य केले.
यावर्षी जून महिन्यात नितीशकुमार यांनीच पाटणा येथे भाजप विरोधी पक्षांची पहिली बैठक आयोजित केली होती. या बैठकीतच इंडिया आघाडीची मूहूर्तमेढ रोवली गेली. यानंतर बहुचर्चित इंडिया आघाडीचा बोलबालाही झाला.मात्र पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर होताच आघाडीतील पक्षांचा सूर बदलला. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. यामुळे समाजवादी पार्टीने आघाडी करायची नसेल तर स्पष्ट सांगा, असा इशाराच दिला. त्यामुळे इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) च्या पाटणा येथे आयोजित सभेत बोलताना नितीश कुमारांनी इंडिया आघाडीतील सद्यस्थितीवर भाष्य केले. यावेळी 'सीपीआय'चे सरचिटणीस डी राजा आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
यावेळी नितीश कुमार म्हणाले की, केंद्रातील सध्याच्या राजवटीला विरोध करणारे पक्ष नवीन युती स्थापन करण्यासाठी एकत्र आले होते. मात्र या आघाडीवर फारशी प्रगती झालेली नाही. काँग्रेस पक्षाला पाच विधानसभा निवडणुकांमध्ये जास्त रस असल्याचे दिसते. इंडिया आघाडीत आपण सर्वांनी काँग्रेसला प्रमुख भूमिका देण्याचे मान्य केले होते; परंतु सध्या तरी असे दिसते की, पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतरच काँग्रेस उत्तर देईल. तसेच पुढील बैठक बोलावतील,".
केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाने स्वातंत्र्याच्या लढ्यात कोणतीही भूमिका बजावली नाही. हे सत्य लपवण्यासाठी देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.बिहार तुलनेने सांप्रदायिक अशांततेपासून मुक्त राहिले आहे. सुमारे एक वर्षापूर्वी हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केले गेला, असे आरोपही यावेळी नितीश कुमारांनी भाजपवर केला.
हेही वाचा :