Latest

नितीशकुमार पुन्हा ‘एनडीए’च्या वाटेवर

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ममता बॅनर्जी आणि 'आप' यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता थेट नितीशकुमार 'एनडीए'च्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवे मंत्रिमंडळ स्थापन करून विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस ते करणार असल्याचे बोलले जात आहे.

नितीशकुमार यांनी 'जेडीयू'च्या सर्व आमदारांना पाटण्यात तातडीने बोलावले असून, या बैठकीनंतर ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे. त्यानंतर भाजप, जीतनराम मांझी व इतरांच्या मदतीने सरकार स्थापन करून नंतर विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस ते करतील, असे सूत्रांनी सांगितले.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप नेत्यांना नितीशकुमारांबाबत साशंकता असली, तरी पक्षश्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांना या विषयावर न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांना तातडीने दिल्लीत पाचारण करण्यात आले असून, ते आणि सुशीलकुमार मोदी हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेणार आहेत.

गेल्या आठवड्यातच दिसली चिन्हे

गेल्या आठवड्यापासूनच नितीश यांच्या बदलत्या भूमिकेची चिन्हे दिसू लागली. त्यांनी घराणेशाहीबाबत जाहीर विधान करून लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले. बुधवारी त्यांनी काँग्रेसने दिलेले भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण सांगून नाकारले होते.

इंडिया आघाडीवरच नाराज

नितीशकुमार इंडिया आघाडीवर नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. इंडिया आघाडीचा निवडणूक तयारीचा ढिसाळपणा व त्यातच पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत इंडिया आघाडीने निर्णय न घेतल्याने ते नाराज होते, तसेच इंडिया आघाडीच्या प्रमुखपदाबाबतही डावलण्यात आल्याने ते नाराजच होते.

पाचवेळा घेतला 'यू टर्न'

72 वर्षीय नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणातील ताकदवान नेते आहेत व त्यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेली नाही. 2013 पासून त्यांचे 'एनडीए' ते 'यूपीए' ते महागठबंधन असे चारवेळा 'यू टर्न' झाले आहेत. आधी ते 'यूपीए'मध्ये होते. त्यानंतर त्यांनी 'एनडीए'ची कास धरली. त्यानंतर तेथून बाहेर पडत महागठबंधनमध्ये प्रवेश केला. आतासुद्धा इंडिया आघाडीच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला; पण आता तेच पुन्हा 'एनडीए'च्या तंबूत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT