पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मागील काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. विधानसभेत महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठविण्यात आली होती. तेव्हापासून ते मीडियापासून दूर राहू लागले आहेत. नितीशकुमार एका कार्यक्रमात सहभागी होऊन बाहेर येत होते. त्यावेळी काही पत्रकारांनी त्यांना विचारले की, साहेब तुम्ही नाराज आहात का ? यावर नितीश कुमार यांनी कोणतेही उत्तर न देता झुकून पत्रकारांना नमस्कार केला. (NitishKumar)
इतकेच नाही तर यावेळी त्यांचे सुरक्षा कर्मचारी कॅमेऱ्यासमोर आले. तेव्हा नितीश कुमार बाजूला सरकत पत्रकारांसमोर वाकून प्रतीकात्मक आरती करताना दिसून आले. यानंतर नितीश कुमार आपल्या गाडीमध्ये बसून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता तेथून निघून गेले. नितीश कुमारांना मीडियासमोर हात जोडावे लागले आहेत, अशी काय परिस्थिती आली आहे, अशी चर्चा तिथे उपस्थितांत सुरू झाली. (NitishKumar)
यापूर्वी, सीएम नितीश यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते महावीर मंदिरात आरती करताना इकडे-तिकडे बघताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते काहीतरी शोधत असल्याचे दिसत आहे. नितीश कुमार यांनी अलीकडेच महिलांविरोधात आणि नंतर जीतन राम मांझी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली आहे.
नुकतेच मंत्री अशोक चौधरी यांच्या वडिलांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी नितीश कुमार आले होते. तेव्हा छायाचित्रांवर फुले न टाकता त्यांनी स्वत: अशोक चौधरी यांच्यावरच फुले टाकली होती. त्याआधीही मीडियासमोर त्यांनी अशोक चौधरी यांची मान पकडून त्यांना मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सांगितले होते. तर एका ठिकाणी नितीश कुमार यांना सरकारच्या कामाबद्दल विचारले असता त्यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना उत्तर देण्यासाठी पुढे केले होते.
हेही वाचा