Latest

बारामती: एसटी बसची फेरी पूर्ण न करता अर्ध्यातूनच परत आणल्यामुळे नऊ कर्मचारी निलंबित

अमृता चौगुले

बारामती, पुढारी वृत्तसेवा: कामात कुचराई करण्याचा ठपका ठेवत राज्य परिवहन महामंडळाच्या बारामती आगारातील चार चालक, चार वाहक व नियंत्रक अशा नऊ जणांना येथील प्रभारी आगार व्यवस्थापक मनीषा इनामके यांनी २ नोव्हेंबर रोजी निलंबित केले. ठरलेल्या मार्गावर बस न नेता ती अर्ध्या रस्त्यातून परत आणल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, त्यासाठी जबाबदार धरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी काही महिलांनी पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्याकडे मोबाईलवरून तक्रार दाखल केली होती.

1 नोव्हेंबर रोजी बारामती ते नीरा या ठिकाणी जाणारी एसटी बस वडगाव निंबाळकर या बस स्थानकातूनच परत आणल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तब्बल चार वाहक व चार चालकांनी बारामतीमधून निघाल्यानंतर वडगाव निंबाळकर येथूनच या चार बसेस माघारी फिरवल्या. त्यामुळे वडगाव निंबाळकर येथून नीरा बाजूकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. याबाबत तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली. या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्याने निलंबनाची कारवाई झाली.

याबाबतच्या तक्रारी थेट रमाकांत गायकवाड यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अशाप्रकारे एसटीची पूर्ण फेरी न करता कोणालाही कल्पना न देता किंवा परवानगी न घेता अर्ध्या रस्त्यातून बस परत आणण्याचा प्रकार शिस्तभंगाचाच आहे. यामुळे याची दखल घेत निलंबनाची कारवाई केल्याचे रमाकांत गायकवाड यांनी सांगितले. बस रस्त्यातून परत आणल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याची ही अलीकडील काळात पहिलीच वेळ आहे. शिस्तभंगाचा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा रमाकांत गायकवाड यांनी याप्रकरणी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT