संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : आपली पुढील राजकीय भूमिका कशी राहील याबाबत सर्व कार्यकर्त्यांशी विचा रविनिमय करून आपण आपली भूमिका आज शनिवारी स्पष्ट करणार असल्याचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, नाशिक पदवीधर मतदार संघात प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि माजी आ डॉ सुधीर तांबे यांचे तब्बल पंधरा दिवसा नंतर संगमनेरात आगमन झाले. त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत केले.
त्यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार तांबे म्हणाले की इतका मोठ्या प्रमाणात आमच्या परिवाराशी वाईट राजकारण होऊन सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले हे मला मिळालेल्या मताधिक्यावरून उघड झाले आहे. माझे वडील माजी आ डॉ सुधीर तांबे यांनी गेल्या 14 वर्षापासून या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाचही जिल्ह्यात जो ऋणानुबंध तयार केला आहे. तो ऋणानुबंध राजकीय पक्षांच्या पलीकडे आहे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आणि शंभरच्या वर संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला असल्यामुळे आम्हीही यश मिळू शकलो असल्याचे आ. तांबे यांनी दिली.
माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी तुम्हाला निवडणूकीत मदत केली का? असे विचारले असता, आ तांबे म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळे ते आणि आम्ही वेगळे नाही तुम्ही जर ग्राउंडलेव्हल वर फिरले तर हे सर्व तुम्हाला सर्व काही दिसून येईल त्यांच्यावरती मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये खांद्यावर शस्त्रक्रिया झाली असून ते बरे झाल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक पदवीधर मतदारसंघांत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही विजयी मिरवणूक आणि जल्लोष रॅली का काढणार नाही. याविषयी आ तांबे यांना विचारले असता ते म्हणाले की माझा एकदम जवळचा जिवलग मित्र व नाशिक ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे. ते एका बाजूला दुःख आहे तर दुसऱ्या बाजूला ही निवडणूक जर काँग्रेसकडून लढली असती तर अजून जास्त आनंद झाला असता, मात्र ती निवडणूक काँग्रेसकडून न लढता अपक्ष लढवावी लागली.
त्यामुळे साहजिकच ते मनात दुःख असल्याचे सांगून ते म्हणाले की ही निवडणूक जर काँग्रेसकडून लढलो असतो तर अजून तो प्रवास जास्त सोपा झाला असता परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे तो थोडा क्लेशदायक झाला आहे. मात्र पदवीधर मतदारसंघातील मतदार मनाने आमच्याशी जोडलेले असल्यामुळे त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच अंतिम निकाल चांगला लागला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.