पुढारी ऑनलाईन डेस्क : डिजिटल न्यूज वेबसाईट फंडिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ (Newsclick Founder) आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने विदेशी निधीच्या तपासासंदर्भात छापा टाकल्यानंतर न्यूज पोर्टलचे कार्यालयही सील करण्यात आले आहे.
दिल्ली-एनसीआर भागात केंद्रित असलेल्या विशेष सेलचा छापा आज (दि. ३) सकाळी सुरू झाला. त्यानंतर प्रबीर पुरकायस्थ यांना 'न्यूज क्लिक'च्या दक्षिण दिल्लीतील कार्यालयात नेण्यात आले. जिथे फॉरेन्सिक टीम आधीच हजर होती. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ३७ पुरुष संशयित आणि ९ महिला संशयितांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली. तसेच डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे तपासासाठी जप्त/संकलित करण्यात आली.
याबाबत अधिक माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादविरोधी कायदा बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत दाखल गुन्ह्यात मंगळवारी सकाळी न्यूजक्लिक आणि त्याच्याशी संबंधित पत्रकारांच्या घरांवर छापे टाकण्यास सुरुवात केली होती. पोलीस ज्या पत्रकारांच्या घरी पोहोचले, त्यामध्ये अभिसार शर्मा, उर्मिलेश, औनिंद्यो चक्रवर्तीआणि परंजय गुहा ठाकुर्ता आणि इतरांचा समावेश होता.