न्यूयॉर्क : सध्या हरेक प्रकारचे रोबो पाहायला मिळत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातही अनेक वर्षांपासून रोबोंचा विविध कामांसाठी वापर केला जात आहे. काही वेळा सामान्य माणसाला जी गोष्ट शक्य होत नाही ती करवून घेण्यासाठी अशा रोबोंचा वापर केला जातो. अनेक जटील शस्त्रक्रिया रोबोंनी पार पाडलेल्या आहेत. आता एक डेंटिस्ट रोबोही आला आहे. तो तोंडातील खराब झालेला दात लिलया बाहेर काढू शकतो. हा रोबो 'एआय' म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काम करतो.
'एआय'मुळे हा रोबो स्वतःच स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. या रोबोबाबतची एक माहिती ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. या ट्विटर पोस्टमध्ये एका व्हिडीओच्या माध्यमातून हा रोबो कसे काम करतो हे दर्शवण्यात आले आहे. 'वाओ टेरीफाईंग' नावाच्या एका अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्यामध्ये दिसते की हा रोबो थेट रुग्णाच्या तोंडात प्रवेश करतो. या रोबोमध्ये अनेक उपकरणे बसवलेली असतात व गरजेनुसार त्यांचा वापर केला जातो. खराब झालेला दात बाहेर काढणे, दातांमध्ये फिलिंग करणे अशी अनेक कामे तो करू शकतो. या रोबोला सध्या सादर करण्यात आले असले तरी अद्याप त्याच्यावर काम सुरू आहे.