Latest

Nepal aircraft crash | नेपाळमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, सर्व ७२ जणांचा मृत्यू, कोणीही वाचले नाही

दीपक दि. भांदिगरे

Nepal aircraft crash : नेपाळमध्ये यती एअरलाईन्सचे काठमांडूहून निघालेले विमान पोखरा विमानतळावर उतरण्यापूर्वी १० सेकंद आधी डोंगराला धडकून दरीत कोसळले होते. यात ७२ जणांचा मृत्यू झाला. यात ५ भारतीयांचा समावेश आहे. विमान कोसळताच आगीचे भले मोठे लोळ आकाशात उसळले. विमानात ६८ प्रवासी होते. याशिवाय ४ क्रू मेंबर्स होते. या सर्वांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असल्याची माहिती काठमांडू येथील विमानतळ अधिकारी शेर बाथ ठाकूर यांनी दिली आहे. या ब्लॅक बॉक्समुळे विमानाच्या अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोखरा येथील घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

रविवारी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे अपघात घडल्याचे आधी सांगण्यात येत होते. पण नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या माहितीनुसार लँडिंगपूर्वी १० सेकंद अगोदर या विमानातून आगीचे लोळ दिसून आले. त्यामुळे तांत्रिक बिघाड हेच अपघाताचे कारण असावे, असे आता मानले जात आहे.

ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणी बचाव पथकाला कोणीही जिवंत आढळून आलेले नाही, अशी माहिती नेपाळ लष्कराने सोमवारी दिली. 'आम्हाला दुर्घटनास्थळावरून कोणालाही जिवंत वाचवता आलेले नाही." असे नेपाळ लष्कराचे प्रवक्ते कृष्ण प्रसाद भंडारी यांनी म्हटले आहे. (Nepal aircraft crash)

नेपाळमध्ये विमाने मृत्युदूत ठरत आहेत. नेपाळमधील रविवारचा विमान अपघात हा गेल्या ३० वर्षांतील २८ वा विमान अपघात आहे. १९९२ ला पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले होते. त्यात सर्व १६७ लोकांचा मृत्यू झाला होता. दुर्गम पर्वतीय भूभाग, प्रतिकूल हवामान, जुनी विमाने आणि अननुभवी वैमानिक यामुळे नेपाळ हा विमान उड्डाणासाठी सर्वात धोकादायक देश बनला आहे.

नेपाळमधील विमान दुर्घटना

२०१० – तारा एअरलाईन्सचे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. तीन क्रू सदस्यांसह विमानातील सर्व २२ लोक ठार झाले. त्याच वर्षी आणखी एका विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला.

१९९२ – पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले होते. त्यात सर्व १६७ लोकांचा मृत्यू झाला होता.

२०११ – बुद्ध एअरचे विमान ललितपूर येथे कोसळले. विमानातील सर्व २२ जणांचा मृत्यू. १० भारतीयांचा समावेश.

२०१२ – सीता एअर फ्लाईट ६०१ क्रॅश होऊन १९ जणांचा मृत्यू. या वर्षाच्या सुरुवातीला आणखी एका विमान अपघातात १५ जणांचा मृत्यू.

२०१६ – पोखरा ते जोमसन विमान उड्डाणानंतर आठ मिनिटांत बेपत्ता. २३ जणांचा मृत्यू. अवशेष नंतर म्याग्दी जिल्ह्यात सापडले.

२०१८ – त्रिभुवन विमानतळावर उतरत असताना यूएस-बांगला एअरलाईन्सचे विमान कोसळले; ५१ जणांचा मृत्यू.

२०१९ – हेलिकॉप्टर टेकडीवर आदळले. नेपाळचे पर्यटन मंत्री रवींद्र अधिकारी आणि उद्योजक आंग त्शिरिंग शेर्पा यांच्यासह ७ जणांचा मृत्यू

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT