नीट-यूजी पेपरफुटीचा घोटाळा File Photo
Latest

'नीट' पेपरफुटीचा महाराष्ट्रातील मास्टरमाईंड संजय जाधव गजाआड

महाराष्ट्रातील दोन आरोपींपैकी दुसरा संशयित आरोपीला पकडण्यात पोलिस प्रशासनाला पकडण्यात यश

करण शिंदे

लातूर, पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या घोटाळ्याची पाळेमुळे लातूर पर्यंत पोहचली असून या प्रकरणी येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात रविवारी रात्री उशीरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जलील उमरखा पठाण (शिक्षक रा. कातपूर, जि. लातूर),संजय तुकाराम जाधव (सोलापूर जि.प. शिक्षक, रा. बोथी तांडा, जि.लातूर), ईरण्णा मष्णाजी कोंगलवार (रा. देगलूर जि. नांदेड, आयटीआय शिक्षक, उमरगा, जि. धाराशिव) व दिल्लीची गंगाधर नावाची व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत यातील जलील उमरखा पठाण याला अटक करण्यात आली असून सोमवारी (दि.२४) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास २ जुलै पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फरार आरोपी संजय तुकाराम जाधव यालाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

देशात धुमाकुळ घालणाऱ्या या प्रकरणाचे लातूर कनेक्शन असल्याचे पुरावे मिळाल्याने नांदेड येथील एटीएस पथकाने २२ जून रोजी जलील उमरखा पठाण व संजय तुकाराम जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशीनंतर लगेच सोडून दिले होते. दरम्यान या दोघांबाबत काही आक्षेपाहार्य बाबी समोर आल्याने २३ जून रोजी या दोघांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता व जलील उमरखा पठाण यास अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास लातूरचे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे हे करीत आहेत.

एटीएसच्या प्राथमिक तपासात संजय जाधव व जलील पठाण यांच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांची हॉलटिकीट, विद्यार्थ्यांशी व्हॉटसअपवर त्यांनी केलेली चॅटींग,आर्थिक व्यव्हारांसंबधीची माहिती आढळली. आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. पैशाच्या मोबदल्यात हे काम करीत होते अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपाहार्य बाबी आढळल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींनी कोणाशी संपर्क केला, कोणासी चॅट केले त्यांचीही चौकशी होऊ शकते. आरोपी गंगाधर याच्या शोधार्थ लातूर पोलिसांचे पथक दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

याचा होईल तपास

दरम्यान दिल्लीच्या गंगाधरशी लातूरच्या शिक्षकांशी कसा संपर्क झाला? त्यांनी कसा व कोठे पेपर फोडला ? फोडलेला पेपर कोठे-कोठे व कसा पुरविला? .त्यासाठी किती व कोणा-कोणा कडून पैसे घेतले? आरोपीचा अन्य कोणत्या परीक्षा पेपर फूटीशी संबध आहे ? त्यांना याकामी सहकार्य करणारे एखादे रॅकेट आहे? याचा तपास होणार असून त्यातूनही अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT