पुढारी ऑनलाईन डेस्क : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने (Neeraj Chopra) बुडापेस्ट (हंगेरी) येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (world athletics championship 2023) शानदार खेळ दाखवला. त्याने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत (javelin throw event final) स्थान निश्चित केले आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भालाफेक (javelin throw) करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार आहे.
नीरजने जसा भाला फेकला, त्यानंतर त्याच्या हा थ्रो पाहून सर्वांचे डोळे विस्फारले. त्याने फेकलेला हा भाला 90 मीटरचे अंतर सहज कापेल असा अंदाज तज्ञांनी लावला. पण भाला 90 मीटरचा टप्पा ओलांडू शकला नाही. असे असतानाही भारताच्या स्टार खेळाडूने विश्वविक्रम केला. 88.77 मीटरसह जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा नीरज पहिला खेळाडू ठरला.
नीरज चोप्राला गट-अ मध्ये स्थान देण्यात आले, ज्यात गतविजेते अँडरसन पीटर्स आणि ज्युलियन पीटर्स यांचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीम आणि जेकब वडलेच या स्टार खेळाडूंना ब गटात ठेवण्यात आले आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी 83 मी. भालाफेक करायचे होते. नीरज चोप्रासाठी हे लक्ष्य सहज पार केले.
नीरज चोप्राची चालू हंगामातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी त्याची चालू हंगामातील सर्वोत्तम कामगिरी 88.67 होती. यासोबतच तो पुढील वर्षी होणा-या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. ही स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान खेळवले जाणार आहे. दरम्याब, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मार्क 85.50 मीटर आहे, जी नीरजने सहज पार केली. 88.77 मीटर ही नीरजची कारकिर्दीतील चौथी सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याचा सर्वोत्तम थ्रो 89.94 मीटर असून त्याने ही कामगिरी गेल्या वर्षी जूनमध्ये डायमंड लीगमध्ये केली होती.
आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेले नाही. पण निरज चोप्राने या स्पर्धेत 2022 मध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. यासह भारताची पदकासाठीची 19 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आली होती. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 1983 मध्ये सुरू झाली. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत केवळ दोनच पदके जिंकली आहेत. अंजू बॉबी जॉर्ज पॅरिस 2003 मध्ये महिलांच्या लांब उडीत जागतिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली होती.
नीरज चोप्रासह डीपी मनू हा गट-अ मधून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. मनूचा थ्रो ने 81.31 मीटरपर्यंत मजल मारली. तर ब गटात किशोर जेनाने 80.55 मीटरच्या पहिल्या थ्रोने आश्वासक सुरुवात केली पण त्याचा दुसरा थ्रो केवळ 78.07 मीटरपर्यंतच जाऊ शकला. गट-ब मध्ये तो पाचव्या स्थानावर राहिला आणि अशा प्रकारे अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी झाला.
नीरज चोप्राने पावो नूरमी गेम्स 2022 मध्ये 89.30 मीटर, पटियाला येथील 2021 इंडियन ग्रां प्री 3 मध्ये 88.07 मीटर आणि जकार्ता येथे 2018 आशियाई गेम्समध्ये 88.06 मीटर थ्रो केला आहे. त्याने आतापर्यंत एकूण 42 वेळा 85 मीटरचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, अँडरसन पीटर्स जो त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानला जातो, तो पात्रतेच्या तीनही प्रयत्नांमध्ये 80 मीटरचा टप्पा पार करू शकला नाही. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत नीरज चोप्रा इतिहास रचून भारताचे नाव सुवर्ण पदकावर कोरेल असा दावा केला जात आहे.
1. नीरज चोप्रा (भारत) – 88.77 मीटर
2. अर्शद नदीम (पाकिस्तान) – 86.79 मीटर
3. जेकब वडलेच (झेक प्रजासत्ताक) – 83.50 मीटर
4. ज्युलियन वेबर (जर्मनी) – 82.39 मीटर
5. एड्रिस मातुसेविसियस (लिथुआनिया) – 82.35 मीटर
6. डीपी मनू (भारत) – 81.31 मीटर
7. डेव्हिड वॅगनर (पोलंड) – 81.25 मीटर
8. इहाब अब्देलरहमान (इजिप्त) – 80.75 मीटर
9. किशोर जेना (भारत)- 80.55 मीटर
10. ऑलिव्हर हेलँडर (फिनलँड) – 80.19 मीटर
11. टिमोथी हर्मन (बेल्जियम) – 80.11 मीटर
12. अँड्रियन मार्डारे (मोल्दोव्हा) – 79.78 मीटर