पुढारी ऑनलाईन डेस्क : Diamond League Final : डायमंड लीग 2023 च्या अंतिम फेरीत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) दुसऱ्या स्थानावर राहिला. अशाप्रकारे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. चेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेचने सुवर्णपदक जिंकले.
गेल्या महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजने (Neeraj Chopra) सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले होते. त्यामुळे डायमंड लीगसारख्या (Diamond League Final) प्रतिष्ठित स्पर्धेमध्येही तो सुवर्ण पदक जिंकेल अशी अपेक्षा होती. पण या स्पर्धेमध्ये त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. अवघ्या अवघ्या 0.44 सेंटीमीटरने त्याचे सुवर्ण पदक हुकले. नीरजने गेल्या वर्षी डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
नीरजने (Neeraj Chopra) डायमंड लीगच्या अंतिम फेरीची (Diamond League Final) सुरुवात फाऊलने केली. मात्र दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटरचा थ्रो केला. अंतिम फेरीत त्याचा हा सर्वोत्तम थ्रो ठरला. नीरजने त्याच्या पुढच्या चार प्रयत्नांमध्ये आणखी एक फाऊल केला आणि त्याला 83.80 मीटरच्या पुढे भाला फेकता आला नाही. अंतिम फेरीत नीरज आपल्या लयीत दिसला नाही. त्याने दोन प्रयत्नांत फाऊल केले, तर बाकीच्या थ्रोमध्ये त्याने निराशा केली. तर सुवर्णपदक पटकावणाऱ्या झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेचने पहिल्याच प्रयत्नात 85.86 मीटरचा थ्रो केला. पण त्याने अंतिम प्रयत्नात 84.24 मीटरचा थ्रो करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
पहिला प्रयत्न : फाऊल
दुसरा प्रयत्न : 83.80 मीटर
तिसरा प्रयत्न : 81.37 मीटर
चौथा प्रयत्न : फाऊल
पाचवा प्रयत्न : 80.74 मीटर
सहावा प्रयत्न : 80.90 मीटर
जर नीरजला डायमंड लीगचे विजेतेपद राखण्यात यश मिळाले असते तर असे करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील फक्त तिसरा खेळाडू ठरला असता. त्याच्या आधी झेक प्रजासत्ताकच्या व्हिटेस्लाव्ह वेसेलीने 2012 आणि 2013 मध्ये ही कामगिरी केली होती, तर जाकुब वडलेचने 2016 आणि 2017 मध्ये ही कामगिरी केली आहे.
1. जाकुब वडलेच (झेक प्रजासत्ताक) : 84.24 मीटर
2. नीरज चोप्रा (भारत) : 83.80 मीटर
3. ऑलिव्हर हेलँडर (फिनलंड) : 83.74 मीटर
4. अँड्रियन मार्डारे (मोल्दोव्हा) : 81.79 मीटर
5. कर्टिस थॉम्पसन (यूएसए) : 77.01 मीटर