Latest

अस्तरीकरणाबाबतची भूमिका स्पष्ट करा, इंदापूर पश्चिम भागातील शेतकर्‍यांची दोन्ही माजी मंत्र्यांकडे मागणी

अमृता चौगुले

संतोष ननावरे
शेळगाव : निरा डावा कालव्याला बारामतीप्रमाणेच इंदापूर तालुक्यातही विरोध होत आहे. तालुक्याच्या काही भागात विरोध तर काही भागात समर्थन मिळत आहे. भविष्यातील संघर्षाची शक्यता पाहता तालुक्यातील शेतक-यांनी हर्षवर्धन पाटील व दत्ता भरणे या दोन्ही माजी मंत्र्यांना राजकीय जोडे बाजूला ठेवून शेतकरी हितासाठी ठाम भूमिका घेण्याची मागणी केली आहे.

वीर धरणातून निरा डावा कालव्याची 1888 मध्ये निर्मिती झाली. वीर धरण ते इंदापूर तालुक्याचे कालव्याचे शेवटचे टोक या 161 किलोमीटर अंतरापर्यंत हा कालवा आहे. कालव्यावरील ठराविक ठिकाणी 35 किलोमीटर अंतरावर पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात अस्तरीकरणाचे काम जलसंपदा विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. बारामती व इंदापूर तालुक्यात प्राथमिक स्वरूपाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. मात्र, बारामतीप्रमाणेच इंदापूर तालुक्यातही अस्तरीकरणाला गावोगावी शेतकरी व शेतकरी संघटनेकडून विरोध होत आहे. गोतोंडी, शेळगाव व निमगाव केतकी या ठिकाणी सर्वपक्षीयांकडून रस्ता रोको आंदोलनही झाले. दुसरीकडे लासुर्णेप्रमाणे निमसाखरलाही समर्थनाबाबत आंदोलने होत आहेत. शेतकरी वर्गात दोन गट पडले आहेत. मात्र आतापर्यंत या सर्व घडामोडीत तालुक्यातील दोन्ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांनी विरोधात किंवा समर्थनात भूमिका स्पष्ट केली नाही.

निरा डावा कालव्याच्या जीवावर भवानीनगर, काझड, बोरी, लासुर्णे, अंथुर्णे, शेळगाव, गोतोंडी, निमगाव केतकी, वरकुटेसह अन्य कालव्यालगतच्या व आजूबाजूच्या गावातील शेतकर्‍यांनी जमीन विकत घेऊन कोट्यवधी रुपये खर्च करून विहीर पाईपलाईन केल्या आहेत. कालव्याचे अस्तरीकरण झाले तर शेतीसाठी पाणीटंचाई निर्माण होऊन फळबागांसह अन्य शेती व्यवसाय धोक्यात येऊन शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत, पिण्याच्या पाण्याचीही मोठी टंचाई निर्माण होणार आहे, ही भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. म्हणून ते अस्तरीकरणाला विरोध करत आहेत. दुसरीकडे कालव्यापासून लांब असलेल्या भागातील शेतकर्‍यांना अस्तरीकरण झाल्यास सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कालव्यातून आवर्तनावेळी होणारी पाणी गळती कमी होऊन वेळेवर व वाढीव आवर्तन मिळेल, या भावनेतून काही भागातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतक-यांच्या दोन गटात भावी काळात मोठ्या संघर्षाची शक्यता आहे. यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांनी दोन्ही बाजूच्या शेतकर्‍यांसमवेत एकत्रित बैठक आयोजित करून तोडगा काढण्याची मागणी होत आहे. दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनानंतरही अस्तरीकरणाच्या कामाला वेग

अस्तरीकरणाविरोधात आंदोलन करून त्वरित काम बंद करण्याची मागणी आंदोलकांनी जलसंपदा विभाग, महसूल व पोलिस प्रशासनाकडे केली आहे. मात्र, तरीही अस्तरीकरणाबाबतचे प्राथमिक स्वरूपाचे काम मात्र बंद न होता जोरदारपणे सुरू आहे. निर्णय होइपर्यंत काम बंद ठेवणे गरजेचे असतानाही संबंधित ठेकेदारांनी कामे जोमाने सुरू ठेवली आहेत. यामुळेही शेतकरी वर्गातून मोठ्य उद्रेकाची शक्यता आहे.

ठेकेदाराच्या नातेवाइकांकडूनच समर्थन : पांडुरंग रायते

काही गावातून अस्तरीकरणाला होणारे समर्थनासाठी केवळ संबंधित ठेकेदाराच्या जवळचे नातेवाईक रस्त्यावर उतरवले असून या प्रश्नावरून शेतकरी वर्गात दोन गट पडण्यास संबंधित ठेकेदार कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते पांडुरंग रायते यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT