पुढारी ऑनलाईन: राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशातच 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुका घेण्यास सर्वपक्षीयांचा विरोध आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी अधिक महत्वाचे असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.
राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू असे जयंत पाटील यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर मोठा अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नये अशी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका असल्याचेही माजी मंत्री जयंत पाटील यांनी अगोदरच जाहीर केले आहे.
निवडणूक आयोगाद्वारे राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी मतदान पार पडणार असून 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.