नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली समोर न झुकण्याची शिकवण दिली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात लढण्याचा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळते, अशी भावना पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात (NCP National convention) कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केली.
दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. या अधिवेशनाला (NCP National convention) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरचे आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, गेल्या काही वर्षात देशात मोठे बदल झाले आहेत. शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. देशाला शेतकऱ्यांवर विश्वास व गौरव आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना दुखद आहेत. आपल्या देशातील ५६% लोक शेतीवर अवलंबून आहेत. देशाला शेतकऱ्यांवर गर्व आहे. परंतु, शेतकऱ्यांमध्ये सध्याच्या केंद्र सरकार विरोधात मोठा रोष आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रितपणे लढण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी सांगितले.
देशात अल्पसंख्यांक समाज विरोधाचे वातावरण तयार केले जात आहे. संसदेत तीन कृषी कायद्यांवर संसदेत चर्चा करण्यात आली नाही. जगाने दिल्लीच्या सीमेवर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतली, अशा शब्दात पवारांनी शेतकरी आंदोनाची स्तुती केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांच्या अडचणी येतील, त्या त्यावेळी राष्ट्रवादी लढण्यासाठी मैदानात उतरेल, असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
देशाचे नव नियुक्त सरन्यायाधीश यू.यू.लळीत यांच्या उपस्थितीत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्ला चढवला. ज्यांच्या विरोधात खटला सुरु आहे त्यांची सरन्यायाधीशांसोबत व्यासपीठावर उपस्थिती उचित आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंती पाटील यांनी उपस्थित केला. पक्षाला बळ देण्यासाठी अधिवेशन महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचा :