पुढारी ऑनलाईन: अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अनिल देशमुख हे आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
माजी मंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना आर्थर रोड कारागृहामध्ये ठेवण्यात आलं आहे. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ते अचानक चक्कर येऊन खाली पडले. यानंतर कारागृहातील डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पुढील दोन दिवस त्यांना रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितले होते असा आरोप केला होता. पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.