गुडाळ(कोल्हापूर); आशिष ल. पाटील : माजी आमदार के. पी. पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या मेव्हण्या – पाहुण्यातील मतभेदाची दरी आणखी रुंदावली आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा असलेले आ. हसन मुश्रीफ यांचा वरदहस्तही केपी यांनाच असल्याचा समज पक्का झाल्याने ए. वाय. पाटील राष्ट्रवादीचे घड्याळ हातातून काढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, ए. वाय. पाटील यांचे जिवलग मित्र असलेले शिंदे सेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासोबत ए. वाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अलीकडेच मुंबईत भेटल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे मेव्हणे के. पी. पाटील यांच्या विरोधात उघड संघर्ष करण्यासाठी आता एवाय हातात ढाल- तलवार घेतील अशी चर्चा आहे.
एवाय यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यास बिद्री आणि भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसह राधानगरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचेही संदर्भ बदलून जाणार आहेत. एवाय यांनी ना. शिंदे गटात प्रवेश केल्यास आ. प्रकाशराव आबिटकर यांच्या हातात हात घालून ते आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आ. आबिटकर यांनाही स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बळ मिळणार आहे.
केपी आणि एवाय या मेव्हण्या – पाहुण्यातील सुप्त संघर्ष तसा 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू आहे. त्यावेळी विधानसभेत इच्छुक असलेल्या एवाय यांना थांबवून पक्षाने पुन्हा केपींना संधी दिली होती. 2015 च्या भोगावती निवडणुकीत केपी यांचे जावई धैर्यशील पाटील (कौलवकर) यांची सत्ता घालवण्यात एवाय यांचा हात असल्याचा उघड आरोप केपी समर्थकांनी केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत एवाय यांनी पुन्हा उमेदवारीची मागणी केली होती.
विधानसभेची उमेदवारी किंवा बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन पद असे दोन पर्याय त्यांनी पक्षासमोर ठेवले होते. पक्ष नेतृत्वाने केपी यांना पुन्हा विधानसभा उमेदवारीची संधी दिली. त्यावेळी मुदाळ येथील प्रचार शुभारंभाच्या सभेत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी एवाय यांचा योग्य सन्मान करण्याची ग्वाही दिली होती. खासगी बैठकीतही एवाय यांना चेअरमनपद द्यावे अशी सूचना खा. पवार यांनी केली होती, असे सांगण्यात येते. मात्र 2019 च्या निवडणुकीत केपींचा पुन्हा पराभव झाला आणि या पराभवाला एवाय यांनीही हातभार लावल्याचा आरोप केपी समर्थकांनी उघडपणे केला होता. त्यानंतर बिद्रीची खुर्ची दिली नाहीच मात्र तेव्हा एवाय यांनी विधानपरिषद मागणीसाठी पक्ष नेतृत्वाकडे शिष्टमंडळ नेल्यानंतर केपी यांनीही स्वतःसाठी शिष्टमंडळ पाठवून एवाय यांच्या मागणीला खो घातल्याचा आरोप एवाय समर्थकांनी केला होता.
2020 मध्ये कोल्हापूर बाजार समितीवर प्रशासकीय अध्यक्ष नेमताना एवाय इच्छुक होते. मात्र आ. मुश्रीफ यांनी केपींना पसंती देऊन पुन्हा आपल्यावर अन्याय केल्याची एवाय यांची भावना झाली. बुधवारी भुदरगड तालुक्यात प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी मेळाव्याकडे पत्रिकेतील मानापमानाच्या मुद्द्यावर वरून जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी पाठ फिरवली तसेच आ. जयंत पाटील यांच्याकडे पक्षात होत असलेल्या अन्यायाबाबत स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. गेल्याच आठवड्यात आपल्या काही निवडक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एवाय यांनी राष्ट्रवादीमध्ये आपली गळचेपी होत असून आता हे सारे सहन करण्याच्या पलीकडे असल्याचा पाढा वाचला होता. उपस्थित कार्यकर्त्यांनी तुम्ही घ्याल त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे एवाय लवकरच काहीतरी वेगळा निर्णय घेतील अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे.
आ.मुश्रीफ यांचे आ.जयंत पाटलाना साकडे
कडगावच्या मेळाव्यात आ. मुश्रीफ यांनी मेहुण्या – पाहुण्यांच्या वादाला जाहीर तोंड फोडले होते. त्यांनी आता हा वाद आपल्या आटोक्याच्या बाहेर गेला असून प्रदेशाध्यक्षांनी खा. शरद पवार आणि आ. अजित पवार यांच्या समोरच हा वाद मिटवावा अशी विनंती आ. जयंत पाटील यांच्याकडे जाहीरपणे केली. तसेच हा वाद टोकाला गेल्याची जाहीर कबुलीच यावेळी दिली होती.
अधिक वाचा :