कराड, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांनी बंड केल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. मात्र या परिस्थितीत कराड व पाटण तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहिल्याचे दिसून येत आहे. खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांच्या कराड दौर्यात शक्तिप्रदर्शन घडवले तर पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर शरद पवार यांच्या भेटीला आले. या दोन्ही तालुक्यातील नेत्यांनी 'साहेब आम्ही तुमच्या सोबतच आहे' हे दाखवून दिले आहे.
रविवारी राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांचे काही ज्येष्ठ सहकारी वेगळी वाट चोखाळल शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले. दुपारी शपथविधीही पार पडला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. आमच्या सोबत चाळीस आमदार आहेत, असा दावा अजित पवार यांनी केला. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत कोण, अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, बुधवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन झाले. अजित पवार यांचा आक्रमक पवित्रा, पक्षावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न यातून कोणत्याही टोकाला जाऊन संघर्ष करण्याची त्यांची तयारी असल्याचे स्पष्ट झाले. तर शरद पवार यांनी सामूहिक शक्तीतून नवीन नेतृत्वाची पिढी तयार करूया अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली.
शरद पवार यांच्या संघर्षाच्या काळात कराड व पाटण हे दोन्ही तालुके शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहिले आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर दुसर्याच दिवशी सोमवारी शरद पवार कराड दौर्यावर आले. यावेळी कराड, पाटण तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध विभागातून शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी कराडमध्ये दाखल झाले होते. कराड उत्तर व दक्षिण विभानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याचे श्रेय अर्थात खा.श्रीनिवास पाटील,आ.बाळासाहेब पाटील यांना जाते. 'आम्ही साहेबांसोबत' असे शेकडो फलक कराड शहरात झळकले. खा. श्रीनिवास पाटील, आ.बाळासाहेब पाटील यांनी उघड भूमिका घेत थोरल्या साहेबांप्रति आपली निष्ठा दाखवून दिली.
दरम्यान, हेच चित्र पाटण तालुक्याच्या बाबतीत पहायला मिळाले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह पाटण तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शरद पवार यांच्या समर्थनार्थ कराडला आले होते. 1999 मध्ये ज्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली, त्यादिवशी विक्रमसिंह पाटणकर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत दाखल झाले होते. आज राष्ट्रवादीच्या पडत्या काळातही पाटणकर पिता, पुत्रांनी संपूर्ण पाटण तालुका राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा केली आहे. सातारा जिल्ह्यात कराड, पाटण तालुक्याने पहिल्यांदा शरद पवार यांच्या पाठिंब्याची भूमिका घेतली आहे.
कटू अनुभव असतानाही..
आ.बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले होते. पण तरीही अपक्ष निवडून आल्यानंतर आ. बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्यासोबत राहिले होते. आज शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत. पण आ. पाटील यांनी थोरल्या साहेबांवर असणारी आपली निष्ठा कायम ठेवली आहे. असाच कटू अनुभव पाटणकर यांच्या गाठीशी आहे. 2009 मध्ये निवडून आल्यानंतर विक्रमसिंह पाटणकर यांना अनुभवी व ज्येष्ठ नेते म्हणून मंत्रीपद मिळणे अपेक्षित होते. यादीत नावही होते. पण, ऐनवेळी त्यांचे नाव वगळण्यात आले. तरीही या दोन्ही नेत्यांनी आज अखेर शरद पवारांची साथ सोडलेली नाही.