पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या ४० ते ४५ जागांवर निवडणूक ( Karnataka Election 2023) लढण्याची रणनिती आखत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. आगामी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी ४० ते ४५ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्यभरातील एकूण २२४ जागांपैकी राष्ट्रवादी किमान ४०-४५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. (Karnataka Election 2023)
शरद पवार यांनी १० मे रोजी कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. आम्ही कर्नाटक निवडणुकीच्या अंतिम चर्चेसाठी उद्या मुंबईत बैठक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं आहे की, कर्नाटकाच्या एकूण २२४ विधानसभेच्या जागांवर ४० ते ४५ जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी सांगितलं की, जिथे मोठ्या संख्येने मराठी भाषिक राहतात, त्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला समर्थन देण्याची तयारी करत आहोत.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी १० मेला मतदान असेल तर मतमोजणी १३ मे ला होईल.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर तो परत मिळवण्याचा प्रयत्न एनसपीकडून सुरू आहे. गोवा, मेघायल आणि मणिपूरमध्ये निवडणुकांमध्ये खराब कामगिरीनंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला होता. एनसीपीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना 'अलार्म घड्याळ' चिन्ह देण्याची विनंती केली होती, ते आयोगाने स्वीकारलंही होतं.