Lok Sabha 
राष्ट्रीय

संयुक्त जनता दलाच्या धक्क्याने राज्यसभेत भाजपसमोर अडथळे

backup backup

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा बिहार विधानसभेत संयुक्त जनता दलाने भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. यामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची राज्यसभेतली शक्तीदेखील कमी होणार आहे. सध्या वरिष्ठ सभागृहात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताच्या समीप आहे; पण नितीश कुमार यांचा संयुक्त जद महागठबंधनमध्ये सामील होणार असल्याने राज्यसभेतील रालोआचे संख्याबळ घटणार आहे. त्यामुळे यापुढील काळात महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी त्यामुळे भाजपला अडथळ्यांचा सामना करावा लागेल. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेत एकूण पाच खासदार आहेत. यात उपसभापती हरिवंश सिंग यांचा समावेश आहे.

गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम करणार्‍या पक्षांची संख्या तीनवर पोहोचली आहे. याआधी शिरोमणी अकाली दल आणि शिवसेनेने रालोआची साथ सोडली होती. यातील शिवसेनेचा बंडखोर गट आपण अजूनही रालोआसोबत आहोत, हे सांगत आहे, हे विशेष! चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टीने 2019 मध्ये रालोआशी फारकत घेतली होती.

बहुमताचा आकडा 119

राज्यसभेतील सध्याचे संख्याबळ 237 इतके आहे, तर रिक्त जागांची संख्या 8 इतकी आहे. अशा स्थितीत सध्याचा बहुमताचा आकडा 119 इतका आहे. रिक्त जागांमध्ये जम्मू -काश्मीरमधील चार, त्रिपुरातील एक आणि राष्ट्रपती निर्देशित तीन जागांचा समावेश आहे. रालोआचे विद्यमान संख्याबळ 115 इतके आहेत. यात पाच निर्देशित आणि एक अपक्षाचा समावेश आहे. संयुक्त जनता दलाने रालोआला रामराम केल्यानंतर रालोआचे संख्याबळ 110 पर्यंत खाली घसरले आहे. थोडक्यात, बहुमतासाठी या सदनात रालोआकडे 9 जागा कमी आहेत. अशा स्थितीत वायएसआर काँग्रेस आणि बिजू जनता दलासारख्या कोणत्याही आघाडीत नसलेल्या पक्षांवरील भाजपची भिस्त वाढणार आहे. वरील दोन्ही पक्षांचे वरिष्ठ सभागृहात प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. अलीकडेच झालेल्या राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणुकांत वरील दोन्ही पक्षांसह शिरोमणी अकाली दल, मायावती यांचा बसपा, टीडीपी या पक्षांनी रालोआला साथ दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT