pm modi and rahul gandhi shakehands
लोकसभेत राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींचे हस्तांदोलन file photo
राष्ट्रीय

लोकसभेत राहुल गांधी आणि पीएम मोदींचे हस्तांदोलन; पाहा फोटो

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप खासदार ओम बिर्ला यांची १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या खासदाराला सभागृह नेते म्हणजे पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते त्यांच्या जागेवरून सभापतींच्या खुर्चीपर्यंत घेऊन जातात, अशी परंपरा आहे. ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या आसनापर्यंत घेवून गेले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी हस्तांदोलन केले. हा ऐतिहासिक क्षण होता.

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींशी केले हस्तांदोलन

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी हस्तांदोलन केले आणि नंतर खासदार ओम बिर्ला यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत घेवून गेले. पंतप्रधान मोदी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासोबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील आम बिर्ला यांना सीटवर घेण्यासाठी आले होते. भाजप खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता.

राहुल गांधींनी ओम बिर्ला यांचे केले अभिनंदन

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. विरोधकांना सरकारला सहकार्य करायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. सरकारकडे अधिक राजकीय शक्ती आहे परंतु विरोधी पक्ष देखील भारताचा आवाज आहे. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आम्हाला आमचा आवाज उठवू द्याल. विरोधकांचा आवाज दाबणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. विरोधी पक्ष तुम्हाला पूर्ण मदत करेल, असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान मोदींकडून कौतुक 

लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांच्या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा पीठासीन अधिकारी म्हणून निवड होणे ही सभागृहासाठी सन्मानाची बाब आहे. संपूर्ण सभागृहाच्या वतीने मी तुमचे अभिनंदन करतो. आम्हाला खात्री आहे की, या महत्त्वाच्या काळात तुम्ही आम्हाला पुढील पाच वर्षांसाठी मार्गदर्शन कराल आणि लोकसभा सत्र सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मदत कराल.

SCROLL FOR NEXT