बंगळूर; वृत्तसंस्था; श्रीराम आणि हनुमानाच्या भक्तांनी या देशात राहावे, टिपू सुलतानवर प्रेम करणार्यांनी राहू नये, असे विधान भाजपच्या कर्नाटक प्रदेेशाध्यक्षांनी केल्यानंतर नवीन वाद सुरू झाला असून एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओेवैसी यांनी 'मी घेतो टिपू सुलतानचे नाव, काय करायचे ते करा', असे खुले आव्हान दिल्याने त्यात भरच पडली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांनी कोप्पल जिल्ह्यात यलबुर्गा येथे जाहीर सभेत बोलताना टिपू सुलतानचे गुणगान करणार्यांवर टीका करताना विधान केले होते की, प्रभू श्रीराम आणि हनुमानाची भजने गाणार्यांनाच या देशात राहण्याचा अधिकार आहे. टिपू सुलतानचे गोडवे गाणार्यांनी चालते व्हावे. आम्ही रामाचे भक्त आहोत. टिपू सुलतानचे नाही. टिपूच्या पोरांना घरातून हुसकावणारे आम्ही आहोत, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आव्हानच दिले आहे. ओवैसी यांनी कतील यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहेत का, असा सवाल करतानाच आपण टिपू सुलतानचे नाव घेणार. वारंवार घेणार. बघूच तुम्ही काय करता, अशी आव्हानाची भाषा केली.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांच्या या प्रतिआव्हानामुळे नवीन वाद वाढण्याची चिन्हे असून त्याला आता भाजप कसे प्रत्त्युत्तर देते हे बघावे लागणार आहे.