राष्ट्रीय

महिलांना पुरुषांपेक्षाही करिअरची मोठी आकांक्षा; अनौपचारिक अर्थव्यवस्थेतील पाहणीचा निष्कर्ष

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  देशाच्या अनौपचारिक अर्थव्यवस्थेत काम करणार्‍या अधिकाधिक महिलांना आपले करिअर घडविण्यात अधिक स्वारस्य असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. या पाहणीनुसार, 18 टक्के महिलांची ही इच्छा असून, सुमारे 13 टक्के पुरुष यात रस दाखवत आहेत. सामान्यत:, कमी पगाराच्या आणि तात्पुरत्या नोकर्‍यांच्या संदर्भात केलेली ही पाहणी होती.

या पाहणी अभ्यासानुसार, अनौपचारिक क्षेत्रातील निम्म्याहून अधिक महिला कर्मचारी (56 टक्के) करिअर घडविणे, समाजासाठी योगदान देणे, नवीन कौशल्ये शिकणे, आपल्या आवडी-निवडी जोपासणे इत्यादी पैशांपेक्षा वेगळ्या बाबींना प्राधान्य देतात, असे स्पष्ट झाले आहे. स्टाफिंग फर्म क्वेस कॉर्पोरेशननेही पाहणी सुरू केली आहे.

इथे तब्बल 63 टक्के महिलांना त्यांच्या अनौपचारिक नोकर्‍यांमध्ये पैशांपेक्षा आरोग्य लाभ आणि औपचारिक नोकरीचा करार हवा होता. मात्र, अशी अपेक्षा असणार्‍या पुरुषांची टक्केवारी अवघी 28 होती. देशाच्या अनौपचारिक आणि औपचारिक अर्थव्यवस्थेत महिलांचे मोलाचे योगदान आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे. आता त्यांच्या गरजा विकसित झाल्या आहेत, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. महिलांच्या चांगल्या रोजगारक्षमतेसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करणे, त्यांना रोजगाराच्या संधी शोधण्यात मदत करणे आणि सामाजिक सुरक्षा देणे हेही तितकेच गरजेचे आहे, असे क्वेसच्या कार्यबल व्यवस्थापनाचे अध्यक्ष लोहित भाटिया यांनी सांगितले.

गिग कर्मचार्‍यांमध्ये महिला अधिक

गिग डिस्कव्हरी प्लॅटफॉर्म टास्कमोच्या एका वेगळ्या अहवालानुसार, गेल्यावर्षी महिला गिग कामगारांची मागणी सुमारे दहा पटीने वाढली. टास्कमोचे सह-संस्थापक प्रशांत जनादरी म्हणाले, प्रामुख्याने महिला गिग कर्मचार्‍यांना ज्यात प्राधान्य दिले जाते अशा अनेक नोकर्‍या आहेत. उदाहरणार्थ, कंटेंट मॉडरेशन, बिझनेस एक्झिक्युटिव्ह, टेलिकॉलिंग आणि इतर मार्केटिंग आणि कम्युनिकेशन आदींचा यात उल्लेख करता येईल. टास्कमो गिग इंडेक्सनुसार दूरस्थ पद्धतीने काम करण्याची सुविधा निर्माण झाल्याने महिलांना उपलब्ध असलेल्या नोकर्‍यांत वाढ झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT