अयोध्या; दिलीप शिंदे : महाराष्ट्रात काही लोकांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना लगावला. हिंदुत्व जर सगळ्यांच्या घरात पोहोचले तर त्यांचे कायमस्वरूपी दुकान बंद होईल, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधत काही लोक जाणीवपूर्वक परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. हा एकप्रकारे देशद्रोह आहे, असा संताप मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर व्यक्त केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन निर्माण केले जाईल, अशी घोषणाही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. 'जय श्रीराम,
जय बजरंगबली' अशा जयघोषांत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रॅलीने जात रामलल्ला, हनुमानगढीसह जैनमंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच महाराष्ट्राच्या कल्याणाची प्रार्थना केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आम्ही अयोध्या यात्रेचे राजकरण करीत नसून राम हे आमचे श्रद्धास्थान, आहे, आत्मीयता आहे. पूर्वी मी अयोध्येला आलो होतो, पण आजच्या यात्रेचे नियोजन माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मुख्यमंत्री योगी सरकारने नियोजन केले आहे. हे सांगताना लोकांच्या मनातील सरकार आले असल्याचे शिंदे म्हणाले.
भाजपसोबत गेल्याने काही लोकांच्या पोटात दुखत असून त्यांना त्रास होतो आहे. आजची यात्रा आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. काही जण हिंदुत्वाला बदनाम करीत आहेत, सावरकरांचा अपमान करीत आहेत. हिंदुत्व घराघरात पोहोचले तर त्यांचे दुकान बंद होईल. 400 वरून आता ते 40 आले आहेत, असाही टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. रावणराज या विरोधकांच्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. 2019 मध्ये स्थापन झालेले सरकार हेच रावणराज होते. सत्तेच्या स्वार्थासाठी त्यांनी बाळासाहेबांचे विचार विसरून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. पालघर येथील साधूंची हत्या, पत्रकारांना अटक हे राम राज्य होते का? असा सवाल त्यांनी केला.
अयोध्या यात्रेला फालतुगिरी म्हणणार्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांना जनता उत्तर देईल. मी अयोध्येत असूनही सर्व सचिव तसेच यंत्रणेला सूचना देऊन शेतकर्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चोख उत्तर दिले.
दरम्यान, सकाळी अकरा वाजता अयोध्येतील रामसेतू पार्क येथे हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. त्यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, शिवसेना नेते रामदास कदम आदी नेते उपस्थित होते. त्यांचे हेलिपॅडवर मंत्री दादा भुसे, रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी स्वागत केले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात खुल्या जीपमधून रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच उत्खननात सापडलेल्या वास्तूंचे अवशेष, पुरातन मूर्ती पाहिल्या. नव्याने उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी हनुमानगढीला जाऊन दर्शन घेतले. यावेळी 'बजरंगबली की जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या ठिकाणी भाजप खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सायंकाळी संत-महंतांचे दर्शन घेऊन शरयू नदीवर आपल्या हजारो शिवसैनिक, राम भक्तंसह महाआरती केली. त्याकरिता शरयू नदी काठाचा परिसर सजवण्यात आला होता. संपूर्ण दौर्यात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वत: पोलिस महासंचालक आणि उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्र देव सिंग हे मुख्यमंत्र्यांच्या सोबत होते. यावेळी आयोध्येतील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांदीची गदा, सोन्याचे धनुष्यबाण भेट दिली.
यापुढे देशात रामाचेच राज्य चालणार आणि रामाला मानणारेच देशावर राज्य करणार, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच ज्यांनी प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्न केले ते घरी बसले आणि रामाला मानणार्यांचे सरकार आले, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. जे प्रभू श्रीरामांना मानतात तेच यापुढे देशावर राज्य करतील. रामाच्या गोष्टी करणार्यांनाच जनता गादीवर बसवेल, असे सांगून ते म्हणाले, श्रीराम प्रभूंचे दर्शन घेतल्याचा मोठा आनंद झाला. येथून ऊर्जा, प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ. महाराष्ट्रात रामराज्य कसे येईल यासाठी प्रयत्न करू. रामाकडे काही मागायची गरज नाही. सगळे मिळते. मंदिर पूर्ण झाल्यानंतर मी परत येईन, असेही फडणवीस म्हणाले.