भोपाळ; वृत्तसंस्था : खराब हवामानामुळे काल रात्री ११.३० च्या सुमारास मध्य प्रदेशमधील रीवा येथे विमान दुर्घटना घडली असून यामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच सहवैमानिक जखमी झाला आहे.
रीवा जिल्ह्यात पाल्टन अॅव्हिएशन अॅकॅडमीचे हे प्रशिक्षणार्थी विमान एका मंदिराच्या कळसाला जाऊन धडकले. विमान चालकाचे नाव कॅप्टन विमल कुमार (वय ५४) असून ते बिहारमधील पाटण्याचे रहिवासी होते. एका खासगी प्रशिक्षण कंपनीचे हे विमान मंदिराचा कळस आणि विजेच्या तारांना धडकून अपघातग्रस्त झाले. ही घटना चौरहाटा ठाण्याजवळील उमरी गावातील मंदिरानजीक घडली. अपघातात विमानाच्या पंखा चक्काचूर झाला. विमान मंदिराच्या कळसाला धडकताच स्फोटासारखा जोरदार आवाज झाला. त्यामुळे गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.