राष्ट्रीय

भाजप विरोधकांच्या एकजुटीसाठी ममता, केजरीवालांना सोबत घेणार : शरद पवार

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रातील सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजुटीची मोहीम सुरू केली. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी रात्री काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खर्गे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भाजप विरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोबत घेण्यावर या बैठकीत एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्याची मोहीम पुढे नेली जाणार आहे. यासंदर्भात तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी तसेच आप नेते अरविंद केजरीवाल यांच्याची चर्चा होणे आवश्यक आहे. विरोधी आघाडी मजबूत करण्याची ही तर सुरुवात आहे, अशी टिप्पणी शरद पवार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली.

शरद पवार हे मुंबईहून या बैठकीसाठी आले व त्यांनी आम्हास मार्गदर्शन केले. याबाबत आपण त्यांचे आभारी आहोत. कालच मी आणि राहुल गांधी यांनी संयुक्त जदचे नेते नितीशकुमार तसेच राजद नेते तेजस्वी यादव यांची विरोधी आघाडीच्या संदर्भात भेट घेतली होती. देशात सध्या ज्या गोष्टी सुरू आहेत, त्या पाहिल्या तर देश, घटना, भाषण स्वातंत्र्य आणि लोकशाही वाचविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. महागाई असो अथवा रोजगाराचा ज्वलंत विषय असो, आम्ही सगळे या विषयावर लढा देण्यासाठी एकत्र आहोत, असे खर्गे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले.

'मजबूत, एकत्र!'

खर्गे यांच्या 10, राजाजी मार्ग, निवासस्थानी ही बैठक पार पडली. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर 'मजबूत, एकत्र!' असे ट्विट मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. आमच्या लोकांच्या चांगल्या, उज्ज्वल भविष्यासाठी एकजूट आहोत, असे ट्विट खर्गे यांनी केले. तर भारतीयांच्या मूल्य रक्षणासाठी या वैचारिक लढाईत विरोधक एकजुटीने उभे आहेत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक दृष्टी विकसित करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू, असे राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

अदानी, सावरकर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडील काळात वेगळी मते मांडली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या काँग्रेस नेतृत्वाच्या भेटीला महत्व आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT