भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते, आमदार अनिल विज.  File Photo
राष्ट्रीय

भाजप निवडणूक जिंकल्‍यास मीच हरियाणाचा मुख्‍यमंत्री : अनिल विज

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे. ५ ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी भाजपमधील मुख्‍यमंत्रीपदासाठीचा संघर्ष स्‍पष्‍ट झाला आहे. कारण भाजपने विद्यमान मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पक्षाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. अशाच भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते, आमदार अनिल विज यांनी आपली महत्त्‍वाकांक्षा स्‍पष्‍ट करत मुख्‍यमंत्रीपदावर दावा केला आहे.

पक्षाकडून कधीही काहीही मागितले नाही

माध्‍यमांशी बोलताना भाजपचे सहावेळा आमदार पद भूषवलेले अनिल विज म्‍हणाले की, मी पक्षाकडून कधीही काहीही मागितले नाही; पण भाजपने आगामी विधानसभा निवडणूक जिंकल्यास ज्येष्ठतेच्या आधारे मी मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहे. अंबालातही लोक सांगतात की, मी जनतेच्या मागणीनुसार, मुख्यमंत्री का झालो नाही, आणि यावेळी मी मुख्यमंत्री होण्याचा दावा करणार आहे. पक्षाने माझी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली तर मी हरियाणाचे चित्र बदलून टाकेन, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

मुख्यमंत्रीपदी खट्टरांच्‍या नायब सिंग सैनी यांची वर्णी

यावर्षी मार्च महिन्‍यात भाजप पक्षश्रेष्‍ठींनी हरियाणा मुख्‍यमंत्रीपदी नायबसिंग सैनी यांची नियुक्‍ती केली होती. मनोहर लाल खट्टर यांच्या जागी नायब सिंग सैनी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. ते मनोहर लाल खट्टर यांचे निकटवर्ती मानले जातात. भाजपने विज यांना अंबाला कँट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. हरियाणात ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा राज्यात तिसरा टर्म येण्याचा विचार आहे, भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस निवडणूक जिंकणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT