पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदू ग्राम उभारण्यास सुरवात केली आहे. नुकताच या हिंदू ग्रामचा भूमिपूजन सोहळा पार पडला. बागेश्वर धाममध्ये हे हिंदू ग्राम दोन वर्षात तयार होणार आहे.
या प्रसंगी धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, हिंदू राष्ट्राचे स्वप्न हिंदू घरांपासूनच सुरू होते. प्रथम हिंदू घर, हिंदू ग्राम, हिंदू जिल्हा, हिंदू राज्य आणि नंतरच हिंदू राष्ट्राची संकल्पना पूर्ण होईल. धाममध्येच एक हजार कुटुंबांचे हे ग्राम तयार केले जात आहे.
बागेश्वर धाम जनसेवा समिती हिंदू धर्म आणि सनातन धर्मप्रेमींना जमीन उपलब्ध करून देणार आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, या जमिनीवर इमारती बांधल्या जातील आणि येथे राहणाऱ्यांसाठी काही मूलभूत अटी ठेवल्या जातील. विशेष म्हणजे, या ग्राममध्ये बिगर हिंदूंना प्रवेश वर्ज्य असेल. पण, जर सनातन धर्मावर विश्वास असेल तर इतर धर्मीय येथे येऊ शकतात.
कराराच्या माध्यमातून येथील घरे दिली जाणार आहेत. दरम्यान, पहिल्याच दिवशी दोन व्यक्तींनी इमारती घेण्यासाठी मान्यता दिली आणि कागदपत्रांची कार्यवाहीदेखील पूर्ण केली.जमिनीचे वितरण धाम समिती करेल आणि ती विकत किंवा विक्रीला ठेवता येणार नाही.
दरम्यान, यापूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक व्हिडिओ जारी करत सांगितले होते की, हिंदू राष्ट्र तयार करण्यापूर्वी प्रत्येक घर आणि गावागावात कट्टर हिंदू तयार करण्याचे काम सुरू होईल. हे अभियान या महिन्यापासून सुरू होईल. यासाठी बागेश्वर धामच्या टीम्सने मार्ग दाखवला आहे.
जिथे पाऊस पडत नाही, तिथे पिके खराब होतात. जिथे सनातनचे संस्कार नसतात, तिथे पिढ्या खराब होतात. आम्ही कट्टर हिंदू तयार करण्याचे काम करू. प्रत्येक ग्रामपंचायतीत एक-एक प्रभारी नियुक्त केले जातील, असेही ते म्हणाले होते.