केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन. दुसर्‍या छायाचित्रात काँग्रेस नेत्‍या प्रियांका गांधी-वढेरा. file photo
राष्ट्रीय

'प्रियांका गांधी 'जमात-ए-इस्लामी'च्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत'

Wayanad bypoll : केरळच्‍या मुख्‍यमंत्र्यांचा गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस नेत्‍या प्रियंका गांधी-वढेरा वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जमात-ए-इस्लामीच्या पाठिंब्याने वायनाड पोटनिवडणूक (Wayanad bypoll) लढवत आहेत, असा गंभीर आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला आहे.

काँग्रेसच्‍या धर्मनिरपेक्ष चेहर्‍याचा मुखवटा पूर्णपणे उतरला

कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ इंडियाच्‍या नेतृत्त्‍वाखालील डाव्‍या आघाडीचे वायनाडचे उमेदवार सत्‍यान मोकोरी यांच्‍या कलपेट्टा येथील प्रचार सभेत बोलताना पिनराई विजयन म्‍हणाले की, वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्‍या धर्मनिरपेक्ष चेहर्‍याचा मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. प्रियांका गांधी जमात-ए-इस्लामीच्या पाठिंब्याने निवडणूक लढवत आहेत. त्यावर काँग्रेसची भूमिका काय आहे?," असा सवाल करत जमात-ए-इस्लामी संघटनेची विचारधारा लोकशाहीच्या तत्त्वांशी जुळते का? जमात-ए-इस्लामीसाठी जगभरातील इस्लामी राजवट महत्त्वाची आहे. ते इस्लामिक राजवट आणणे हेच या संघटनेचे उद्‍देश आहे.जमात-ए-इस्लामी राष्ट्र आणि लोकशाहीला महत्त्व देत नाही, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. (Wayanad bypoll)

जमात-समर्थित अपक्षांनी जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवली होती

विजयन म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील जमात नेहमीच निवडणुकीच्या विरोधात होती, परंतु केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या बाजूने उभे राहिले. अनेक जमात-समर्थित अपक्षांनी जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवली होती. केरळमध्ये जमात-ए-इस्लामी म्हणतात, की ते जम्मू-काश्मीरमधील जमातपेक्षा वेगळे आहेत; पण जमातचे एकच धोरण आहे, ते म्हणजे इस्लामिक जगाची स्थापना. त्यांना कोणत्याही प्रकारची लोकशाही शासन व्यवस्था मान्य नाही. ही त्यांची विचारधारा आहे आणि आता त्यांना UDF (केरळमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी) मदत करायची आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

वायनाडमध्‍ये १३ नोव्‍हेंबर रोजी पोटनिवडणूक

केरळमधील वायनाडमध्‍ये १३ नोव्‍हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या मतदारसंघात राहुल गांधी विजयी झाले होते. मात्र त्‍यांनी वायनाड जागा सोडली व रायबरेलीची कायम ठेवली. त्‍यामुळ येथे पोटनिवडणूक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT