राष्ट्रीय

पोटच्या गोळ्याला आईने कारखाली ढकलले; उत्तर प्रदेशातील घटना

अनुराधा कोरवी

लखनौ, वृत्तसंस्था ः उत्तर प्रदेशातील बागपत येथे दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे. एका सावत्र आईने काही मिनिटांपूर्वी आपल्या काळजाभोवती घट्ट पकडून ठेवलेले दीड वर्षीय बालक अमानुषपणे समोरून येणार्‍या कारखाली ढकलून दिले. काही सेकंदांतच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि ते निष्पाप बालक गतप्राण झाले. तरीही आईचा चेहरा निर्विकार असल्याचे दिसून आले.

आता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीता नावाच्या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. बागपत येथे ही महिला आपल्या दोन मुलांसह फिरत होती. त्यातील पाच वर्षांच्या मुलीने आईचे बोट धरले होते. तिलासुद्धा कळत नव्हते की, आई आपल्याला घेऊन उगाचच रस्त्यावर कशासाठी फिरत आहे. अखेर जेव्हा समोरून सुसाट वेगाने कार आली तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेने आपल्या हातातील दीड वर्षीय बालक त्या कारखाली लोटून दिले. सोबत असलेल्या मुलीने आपल्या भावाचा भयानक मृत्यू याची देही याची डोळा पाहिला.

ही घटना घडल्यानंतर हायवेवर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. ही निर्दयी महिला मात्र जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावत होती. मग कोणी तरी पोलिसांना कळवले. पोलिस आले आणि त्या महिलेला अटक करून चौकशीसाठी घेऊन गेले.

निष्ठूरता सरकारी आणि सामाजिक

चिमुरड्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. नंतर सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतदेह त्याच्या वडिलांकडे सोपवला. मात्र रुग्णालयाने मृतदेह घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे मृतदेह हातात घेऊन मुलगी आणि वडील घराच्या दिशेने निघाले. चिमुरड्याच्या बापलेकीकडे एवढेही पैसे नव्हते की, ते खासगी रुग्णवाहिका भाड्याने घेतील. अखेर रस्त्याने जाताना एकमेकांकडे पार्थिव सोपवत या दोघांनी कसेबसे घर गाठले. त्यांना कोणीही मदतीचा हात दिला नाही. निष्काळजी यंत्रणेपुढे हतबल झालेल्या या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

SCROLL FOR NEXT