राष्ट्रीय

पाच वर्षांत दरवर्षी ८५ हजार अपघात; दुपारी तीन ते रात्री नऊ, वाहने जपून चालवा!

दिनेश चोरगे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रस्त्यावरील ३५ टक्के अपघात दुपारी तीन ते रात्री नऊदरम्यान झाले आहेत, असा निष्कर्ष २०१७ ते २०२१ दरम्यानच्या आकडेवारीवरून निघाला आहे. लॉकडाऊनमुळे २०२ मध्ये अपवाद होता, परंतु या पाच वर्षांत एकूण ८५ हजार अपघात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत झाले आहेत.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच अपघातांबाबतची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार २०२१ मध्ये जेवढे अपघात झाले, त्यांपैकी ४० टक्के दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत झाले. त्यामुळे भारतीय रस्त्यांवर हे सहा तास धोकादायक ठरतात, असा इशारा सरकारने दिला आहे. मध्यरात्री १२ ते ६ ही वेळ मात्र अत्यंत सुरक्षित मानली जाते, कारण या वेळेत फक्त १० टक्के अपघात झाले आहेत !

या आकडेवारीनुसार २०२१ मध्ये एकूण ४.१२ लाख अपघात झाले, त्यांपैकी दुपारी तीन ते रात्री नऊदरम्यान १.५८ लाख अपघात झाले. याखालोखाल धोकादायक वेळ ठरली ती दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत १८ टक्के अपघात झाले. २०२१ मधील ४,९९६ अपघात नेमके कोणत्या वेळेत झाले, याची माहिती मिळू शकली नाही, असेही अहवालात म्हटले आहे.

जानेवारी अपघातप्रवण

वर्षातील महिन्यांचा विचार केला असता २०२१ मध्ये जानेवारीत सर्वाधिक ४०, ३०५ आणि त्याखालोखाल मार्चमध्ये ३९, ४९१ अपघात झाले. यात जीवघेणे १४,५७९ अपघात मार्चमध्ये, तर १४ हजार ५७५ अपघात जानेवारीत झाले. त्या वर्षात झालेल्या एकूण अपघातांत एक लाख ५३ हजार ९७२ जणांना जीव गमवावा लागला. २०११ नंतरचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. म्हणजेच, दररोज ४२२ आणि तासाला १८ जणांचा अपघातांत जीव गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT