नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांची दिल्लीत सोमवारी भेट झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महा कुंभातील पवित्र जल असलेला कलश त्यांना भेट दिला.
या भेटीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून दिली. ते म्हणाले की, तुलसी गबार्ड यांचे भारतात स्वागत करताना आनंद झाला. दोन्ही देशांतील विविध विषयांवर चर्चा झाली. विचारांची देवाणघेवाण केली. दोन्ही देश दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी, सागरी आणि सायबर सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, या अगोदर तुलसी यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. तुलसी १८ मार्च रोजी दिल्लीतील रायसीना संवादात संबोधन करतील. यानंतर त्यांच्या आशिया दौऱ्याचा समारोप होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुलसी यांना रायसीना संवादासाठी आमंत्रित केले होते.