राष्ट्रीय

नेहरू एवढे महान होते, तर त्यांचे आडनाव लावायला का घाबरता? : पंतप्रधान मोदी

दिनेश चोरगे

नवी दिल्ली;पुढारी वृत्तसेवा :  "कोणत्याही कार्यक्रमात पंडित नेहरू यांचे नाव घेतले नाही, तर काही लोकांचे रक्त गरम व्हायचे. मग त्यांच्या पिढीतील व्यक्ती नेहरू आडनाव ठेवण्यास का घाबरतात हे मला समजत नाही. एवढी महान व्यक्ती तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान्य नाही आणि तुम्ही आमचा हिशेब मागता?" अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत गांधी घराणे आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर ते बोलत होते.

इंदिरा गांधींवरही टीका

मोदी पुढे म्हणाले, विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी 356 कलमाचा तब्बल 50 वेळा दुरुपयोग इंदिरा गांधी यांनी केला. बुधवारी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दावा केला की, 60 वर्षांत काँग्रेसने मजबूत पाया रचला आणि आता त्याचे श्रेय मोदी घेत आहेत. तथापि, 2014 मध्ये जेव्हा मी बारकाईने गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा 60 वर्षांपासून काँग्रेस परिवाराने सर्वत्र खड्डेच खोदल्याचे दिसून आले. त्या काळात जगातील छोटे देशही यशाच्या शिखरावर पोहोचले, असे मोदी यांनी सांगितले.

जितका चिखल टाकाल, तितके कमळ फुलेल!

सभागृहात जे घडते ते देश गांभीर्याने ऐकतो. पण काही लोकांच्या बोलण्याने सभागृहाचीच नव्हे तर देशाचीही निराशा होत असून हे दुर्दैव आहे. अशा सदस्यांना मी म्हणेन की, 'कीचड़ उसके पास था, मेरे पास गुलाल, जो भी जिसके पास था, उसने दिया उछाल!…' तुम्ही जितका चिखल टाकाल, तितके कमळ फुलेल, असे मोदी यांनी म्हणताच सत्ताधारी बाकांवरून त्यांचे स्वागत करण्यात आले.

'भारत जोडो'वर टीकास्त्र

जे कधी काळी सत्तेत बसायचे, ते देशात ठिकठिकाणी फिरूनही अपयशी ठरले हे काळ सिद्ध करत आहे. देश वेगळेपणाने पुढे जात आहे. आज निराशेच्या गर्तेत बुडालेल्या लोकांनी निरोगी मन ठेवून आत्मचिंतन करणे ही काळाची गरज आहे, अशी टीका पंतप्रधानांनी काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेचा हवाला देऊन केली.

राहुल गांधींना चोख उत्तर

  • काँग्रेसने देशातील कोणत्याच प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही.
  • दलालांना हटवून आम्ही थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात केली हे काँग्रेसचे मुख्य दुखणे आहे.
  • काँग्रेसकडून गरिबी हटविण्याच्या फक्त वल्गना झाल्या, वास्तवातील कामगिरी शून्य.
  • ईशान्य भारतात आम्ही वीज पोहोचविली, काँग्रेसने सतत उपेक्षा केली.
  • जनतेने वारंवार नाकारल्यामुळे काँग्रेस पक्ष वैफल्यग्रस्त झाला आहे.
  • काँग्रेसने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले, त्यांचा वापर केवळ राजकारणासाठी केला.
  • लस बनविणार्‍या शास्त्रज्ञांची काँग्रेसकडून सतत अवहेलना झाली.
  • राजभवनांचे रूपांतर पक्ष कार्यालयात करण्याचे कुकर्म काँग्रेसच्या नावावरच आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT