राष्ट्रीय

भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईला जाती, धर्माचा रंग देऊ नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अमृता चौगुले

नवी दिल्ली :  पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करतो, त्यालाही जाती, धर्म आणि प्रदेशाचा रंग देण्याचे काम केले जाते. एखाद्या माफियाविरुद्ध न्यायालय निकाल देते, त्यालाही हे लोक धर्मभेदाचा रंग देतात, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. मी देशातील सर्व पंथ, सर्व जातींतील लोकांना विनंती करतो तुम्हाला खरोखर आपल्या धर्माचा, पंथाचा, जातीचा अभिमान असेल तर आपापल्या धर्मातील, जातीतील, पंथातील भ्रष्ट, गुंड, माफिया लोकांना जातीपासून दूर ठेवा. सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राच्या आधारे आम्ही आपापल्या राज्यांना नव्या उंचीवर नेऊ. देशाला उंचीवर नेऊ…, असे ते म्हणाले. आज उत्साह आहे. आज उत्सव आहे. भारताच्या लोकशाहीचा हा उत्सव आहे.

निवडणुकीतील प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी मला यंदा होळी 10 मार्चपासूनच सुरू होईल, असे वचन दिले होते. विजयध्वज फडकावून कार्यकर्त्यांनी ते पूर्ण केले. आज आमच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा चौकार ठोकलेला आहे. उत्तर प्रदेशाने या देशाला अनेक पंतप्रधान दिले, पण 5 वर्षे कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदी निवड होण्याचे उदाहरण पहिल्यांदा समोर आले आहे. यूपी, गोवा आणि मणिपूरमध्ये आमचेच सरकार असूनही अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर तर चाललाच नाही, उलट भाजपच्या मतदानाचा टक्का वाढलेला आहे. गोव्याबाबतचे सगळे एक्झिट पोल फोल ठरले आहेत. दहा वर्षे या राज्यात सलग सत्तेत असूनही भाजपच्या जागाही वाढल्या.

उत्तराखंडातही भाजपने इतिहास रचला. राज्यात पहिल्यांदाच सलग दुसर्‍यांदा एखाद्या पक्षाचे सरकार आले आहे. सीमेला लागून असलेले एक डोंगराळ राज्य, एक समुद्राकाठचे राज्य, एक गंगामातेचा आशीर्वाद प्राप्त असलेले राज्य, एक इशान्येकडील राज्य… भाजपला असा चहू दिशांनी आशीर्वाद मिळालेला आहे. चारही राज्यांची आव्हाने वेगळी आहेत. सूत्र मात्र एकच आहे, ते म्हणजे भाजपवरील विश्वास. गरिबांचा हक्क गरिबांच्या दारापर्यंत पोहोचेल, ही हमी भाजप देतो.

कारण भाजपला गरिबांबद्दल करुणा आहे. मी महिला, भगिनी आणि मुलींना वंदन करतो. भाजपच्या या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. स्त्री शक्ती भाजपच्या विजयाचा आधार बनली. सारे जाणकार जेव्हा यूपीच्या जनतेला केवळ जातीपातींच्या तराजूत मोजत होते, तेव्हा मला यातना होत होत्या. यूपीला जातीयवादी ठरवून हे जाणकार लोक एका प्रदेशाची बदनामी करत होते. पंजाबच्या भाजप कार्यकर्त्यांचा मी विशेष आभारी आहे, त्यांनी अत्यंत विपरित परिस्थितीत पक्षाचे काम केले.

आम्ही देशाला विकासाच्या वाटेवर आणत असताना वाट लावण्याचे काम काही लोकांनी केले. लसीकरणाच्या आपल्या प्रयत्नांची जगभरात प्रशंसा होत असताना या पवित्र आणि मानवतावादी कार्यावरही सवाल उपस्थित केले. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले, तेव्हा आम्ही प्रत्येकाला मायदेशी आणण्यासाठी काय केले ते आम्हालाच ठाऊक आणि हे लोक या विद्यार्थ्यांचे त्यांच्या नातेवाईकांचे मनोधैर्य खचविण्याचे काम करत होते.

ऑपरेशन गंगा मोहिमेलाही प्रादेशिकवादाच्या बेड्या घालण्याचा प्रयत्न या कुटील लोकांनी केला. प्रत्येक योजना, प्रत्येक कामाला प्रादेशिकवाद आणि जातीयवादाचा रंग देण्याचे या लोकांचे हे प्रयत्न भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी चिंतेचा विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT