राष्ट्रीय

दलित मतदार मस्त, मुस्लिम मतदार सुस्त

सोनाली जाधव

लखनौ : हरिओम द्विवेदी,
उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या टप्प्यात एकूण 55.79 टक्के मतदान झाले. गत विधानसभा निवडणुकीच्या (2017) च्या तुलनेत हे मतदान 0.68 टक्के कमी आहे. या टप्प्यातील मतदानाचा ट्रेंड पाहिला तर दलितबहुल पट्ट्यात बंपर मतदान झाले असून मुस्लिमबहुल भागात मात्र मतदानात निरूत्साह दिसून आला आहे. याआधीच्या पाचही टप्प्यांमध्ये मुस्लिमबहुल भागात मतदानाचा उत्साह दिसून आला होता.

सहाव्या टप्प्यात 10 जिल्ह्यांपैकी बलरामपूर येथे 37 टक्के, सिद्धार्थनगर 30, संत कबीर नगरमध्ये 24 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. यावेळी बलरामपूरमध्ये सर्वात कमी 48.90 टक्के, सिद्धार्थनगरमध्ये 51.60 टक्के आणि संत कबीर नगरमध्ये 52.20 टक्के मतदान झाले. जे 2017 च्या तुलनेत कमी आहे. तर 24 टक्क्यांहून अधिक दलित लोकसंख्या असलेल्या आंबेडकरनगर, गोरखपूर आणि बस्ती येथे बंपर मतदान झाले आहे. अनुक्रमे 62.22 टक्के, 56.23 आणि 57.20 टक्के मतदान झाले. या टप्प्यात भाजप, सपा आणि बसपा असा त्रिकोणी सामना झाला आहे, काही ठिकाणी काँग्रेसनेही टक्‍कर दिलेली असू शकते.

मतदानाचा ट्रेंड काय सांगतो?

गत तीन विधानसभा निवडणुकांचा अभ्यास केला तर सहाव्या टप्प्यात जेव्हा जेव्हा मतदान वाढले तेव्हा विरोधी पक्षांचाच फायदा झाला आहे. 2017 मध्ये 1.3 टक्के मतदान वाढले आणि भाजपला 38 जागांचा लाभ झाला. 2007 मध्ये 48 टक्के मतदान झाले होते. तेव्हा भाजपला 10, सपाला 19 आणि बसपाला 21 तर काँग्रेसला 5 जागा मिळाल्या होत्या. 2012 मध्ये 55.19 टक्के मतदान झाले व सपाला 32 जागा मिळाल्या होत्या.

ओबीसी-ब्राह्मण मतदार निर्णायक

सहाव्या टप्प्यात ज्या 10 जिल्ह्यांत मतदान झाले त्यात ब्राह्मण आणि ओबीसी मतदार महत्त्वाचे आहेत. ओबीसी समुदायात यादव, कुर्मी, निषाद आणि कुशवाहा मतदार प्रमुख आहेत. पूर्वांचलमध्ये ब्राह्मण मतदारांना किंगमेकर मानले जाते. भाजप, बसपा, सपा आणि काँग्रेस अशा सर्व पक्षांनी येथे उमेदवार निवडीपासून ते आघाडीपर्यंत सर्व बाबतीत काळजी घेतली होती. 2017 मध्ये भाजपने यादव वगळून इतर ओबीसींच्या सहाय्याने पूर्वांचलमधून विरोधकांचा सफाया केला होता. पण यावेळी काटा लढत आहे.

आतापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

पहिला टप्पा 62.43 %
दुसरा टप्पा 64.42 %
तिसरा टप्पा 61.00 %
चौथा टप्पा 61.65 %
पाचवा टप्पा 57.33 %
सहावा टप्पा 55.79 %

7 मार्चला अंतिम टप्प्यातील मतदान

उत्तर प्रदेशात सातव्या आणि अंतिम टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होत आहे. आझमगड, मऊ, गाजीपूर, जौनपूर, वाराणसी, मिर्झापूर, गाझीपूर, चंदौली आणि सोनभद्र या 9 जिल्ह्यांतील 54 जागांवर मतदान होत आहे.

SCROLL FOR NEXT