चेन्नई : चेन्नईत नुकत्याच झालेल्या एका वेगळ्या स्वरूपाच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तामिळनाडूतील एका महिलेने आयुष्यभराचा जोडीदार म्हणून एका बांगलादेशी महिलेची निवड केली आहे. त्यांचा विवाह थाटामाटात पार पडला. तामिळनाडूतील ब्राह्मण समाजाच्या विवाह पद्धतीनुसार कुटुंबीयांच्या साक्षीने या दोघींनी लग्नगाठ बांधली आहे. सुबिक्षा सुब्रमणी आणि टिना दास असे या जोडप्याचे नाव आहे.
आमच्या लग्नाचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होईल, असा आम्ही कधीच विचार केला नव्हता, अशी प्रतिक्रिया या लग्नानंतर सुबिक्षाने दिली आहे. सुबिक्षाचे कुटुंबीय कॅनडातील कॅलगरी शहरात स्थायिक आहे. टिना दास ही बांगलादेशातील हिंदू कुटुंबातील आहे. 29 वर्षीय सुबिक्षा चार्टर्ड अकाऊंटंट आहे. सुबिक्षाने 19 वर्षांची असताना आपल्या आई-वडिलांना आपण समलिंगी असल्याचे सांगितले होते. सुबिक्षाच्या समलिंगी असण्यामुळे भारतातील आमचे नातेवाईक संबंध तोडतील, अशी आम्हाला भीती होती. सुबिक्षाला समाजातील लोक कसे वागवतील याबाबतही आम्ही काळजीत होतो, असे सुबिक्षाच्या आई पूर्णपुष्कला यांनी लग्नानंतर सांगितले. सुरुवातीला या नात्याला विरोध करणार्या सुबिक्षाच्या आई-वडिलांनी नंतर मात्र या लग्नाला संमती दिली.