लेह (लडाख) ; वृत्तसंस्था : विस्तारवादी चीनला कडक प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने कंबर कसली असून शनिवारी पहिल्यांदाच भारतीय लष्करातर्फे लडाख सीमेवर 'के 9 वज्र' या तोफा चीनकडे तोंडे करून तैनात करण्यात आल्या आहेत.
या तोफा 'सेल्फ-प्रोपेल्ड हॉवित्झर' प्रकारातील असून त्यांची मारक क्षमता 50 किलोमीटरपर्यंत आहे. चीनसोबत वर्षभरापासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारतीय लष्कराकडून घेण्यात आला आहे.
चीनकडून आम्ही फक्त एक आगळीक होण्याची वाट बघत आहोत. तसे घडल्यास जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी आम्ही केली आहे, असे भारतीय लष्करातील सूत्रांनी सांगितले. सीमेवरील उंच ठिकाणांतूनही के 9 वज्र तोफांचा वापर करता येणे शक्य आहे. या तोफांची यशस्वी चाचणीही भारताकडून झाली आहे.
लष्कराच्या सर्वच रेजिमेंटना या तोफा मोठ्या संख्येने पुरविण्यात आल्याने सीमेवरील भारताची ताकद वाढलेली आहे. पायाभूत सुविधांचाही विकास भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी चीन आणि पाकिस्तानला उद्देशून शनिवारी या दोन्ही देशांच्या उरात धडकी भरेल, असे वक्तव्य केले आहे.
परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही चीनला एकदाचे निपटूनच घेऊ. आम्ही कुणालाही कमकुवत लेखत नाही; पण पाकिस्तान आमच्या पासंगालाही पुरणार नाही. लडाखला लागून असलेल्या सीमेलगतच्या भागांतून आम्ही पायाभूत सुविधा उभारतच आहोत.
चीनला लागून असलेल्या सीमांवरील संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी भारताने या संपूर्ण भागात सैन्य संख्या वाढविलेली आहे. लष्कर प्रमुख नरवणे यांनी सांगितले की, पाक लष्करासोबत आमची दर आठवड्याला 'डायरेक्टर जनरल ऑफ मिल्ट्री ऑपरेशन' (डीजीएमओ) स्तरीय बैठक होते. पाकिस्तानने कुठल्याही दहशतवादी हालचालींना पाठबळ पुरवता कामा नये, असे आम्ही या बैठकीत स्पष्टपणे पाकला बजावले आहे.
चीनने गेल्या काही दिवसांत सीमेला लागून असलेल्या भागांत सैन्य संख्या वाढविली आहे. चीनला प्रत्युत्तर म्हणून आम्हीही मग सैनिकांचे प्रमाण वाढविले आहे. चीनने पूर्व लडाख आणि उत्तर कमांडव्यतिरिक्त पूर्व कमांडअंतर्गतही मोठ्या संख्येने सैनिक तैनात केलेले आहेत.
भारत आणि चीनदरम्यान ऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यात कमांडरस्तरीय चर्चेची 13 वी फेरी शक्य आहे. चर्चेतून वाद निवळावा हा आमचा प्रयत्न आहे, असेही नरवणे यांनी सांगितले.