राष्ट्रीय

खाद्यतेलाच्या किमतीत घट होण्याची शक्यता

मोहन कारंडे

नवी दिल्ली : तमाम गृहिणींसाठी दिलासादायक बातमी! स्वयंपाकातील खाद्यतेलाच्या किमती जूनपासून कमी होण्याची शक्यता आहे. कारण जागतिक पातळीवरील पामतेलाचा सर्वांत मोठा निर्यातदार असलेल्या इंडोनेशियाने येत्या 23 मेपासून निर्यातबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

रशिया-युक्रेन युद्धासंदर्भातील परिस्थिती स्थिर झाल्यामुळे युक्रेनमधून सूर्यफूल तेलाचा पुरवठा सुधारण्याची अपेक्षा असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. निर्यातीवरील बंदी उठल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतींचा पुरवठा नियमित होण्याची शक्यता आहे. इंडोनेशियामध्ये दरवर्षी अंदाजे 46 दशलक्ष टन पाम तेलाचे उत्पादन होते. त्यातील 9 दशलक्ष टन खाद्यतेल म्हणून आणि आणखी 9 दशलक्ष टन बायोडिझेल म्हणून वापरले जाते. उर्वरित 28 दशलक्ष टन तेलाची निर्यात केली जाते. इंडोनेशियाने 19 मे रोजी पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची घोषणा केल्यावर किंमती 5 टक्के खाली आल्या. मात्र निर्यातदारांना निर्यातीपूर्वी देशांतर्गत साठ्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे किमती पुन्हा 4 टक्के वाढल्या, असे खाद्यतेल आयातदार सनविन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

इंडोनेशियाने खाद्यतेल उद्योगाला घरगुती वापरासाठी 10 दशलक्ष टन पाम तेल राखून ठेवण्यास सांगितले आहे. येत्या काही महिन्यांत विविध प्रकारच्या खाद्य तेलाच्या उपलब्धतेत सुधारणा होईल, असे व्यापार्‍यांनी सांगितले. इंडोनेशियाचा पाम तेल उत्पादन हंगाम आता सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत किमतीत लक्षणीय वाढ होते. दरम्यान, सूर्यफूल तेलाचा पुरवठाही सुधारत आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी भारताचा सूर्यफूल तेलाचा मासिक वापर 200,000 टन होता. मात्र काळ्या समुद्राच्या देशातून पुरवठा थांबल्यामुळे निम्म्याने घटला.

आता युद्ध स्थिरावत असताना, युक्रेनमधून सूर्यफूल तेलाचा पुरवठा हळूहळू लहान बार्ज, रेल्वे आणि रस्त्यांद्वारे होत आहे. भारतातील सूर्यफूल तेलाचा पुरवठा दर महिन्याला आणखी 20,000 टनांनी 25,000 टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे बाजोरिया म्हणाले.

SCROLL FOR NEXT