नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथील अमर सातपुते यांना चामड्यापासून हाताने कोल्हापुरी चपला बनविण्याच्या कलेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सातपुते यांना वर्ष 2019 साठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा चामड्यापासून चपला बनविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सोमवारी सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या वतीने वर्ष 2017, 2018 आणि 2019 साठीचे 'शिल्प गुरू पुरस्कार' आणि 'राष्ट्रीय पुरस्कार' समारंभपूर्वक देण्यात आले. शिल्प गुरू पुरस्काराचे स्वरूप सुवर्णपदक, ताम—पत्र आणि दोन लाख रुपये रोख असे आहे. तर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हस्त शिल्पकारांना ताम—पत्र आणि 1 लाख रुपये रोख प्रदान करण्यात आले.
यवतमाळच्या रजनी शिर्के यांना भरतकाम हस्तकलेसाठी वर्ष 2019 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभय पंडित यांना कुंभार कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंडित यांना वर्ष 2018 च्या राष्ट्रीय हस्त शिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.