नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चीनसह जगभरातील विविध देशांतून कोरोनाने डोके वर काढताच भारतीय शेअर बाजारात बुधवारी घसरण दिसून आली. आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढल्याने औषधे व रुग्णालयाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. डॉ. लाल पॅथलॅब्स लिमिटेडपासून ते विजया डायग्नोस्टिक सेंटरपर्यंतचे समभाग वधारले आहेत.
डॉ. लाल पॅथलॅब्सच्या समभागांत 6 टक्के वाढ झाली, मेट्रोपोलिस हेल्थकेअरमध्ये 3 टक्के, तर विजया डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेडमध्ये 3.16 टक्क्यांची वाढ झाली. बाजार सुरू झाला तेव्हा सुरुवातीला वाढ दिसली; नंतर मात्र 600 अंकांनी घसरून निफ्टी 18,200 च्या पातळीवर पोहोचला, सेन्सेक्समध्ये 30 पैकी 19 समभागांध्ये घसरण झाली. तेल, वायू, वीज, रियल्टी सेक्टरसाठी बुधवारचा दिवस वाईट ठरला. ही सारी क्षेत्रे गमाऊ ठरली. या प्रत्येक क्षेत्रामध्ये 2 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. मंगळवारीही सेन्सेक्स 103 अंकांनी घसरून 61,702 वर बंद झाला होता. निफ्टीत 35 अंकांनी वाढ होऊन 18,385 ची पातळी गाठली गेली होती. सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभागांमध्ये घसरण झाली होती, केवळ 9 क्षेत्रांतील समभागांत थोडी तेजी होती.