राष्ट्रीय

कोरोनाची तिसरी लाट आली की यायची आहे?

Arun Patil

हैदराबाद/नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : कोरोनाची तिसरी लाट आधीच दाखल झाली आहे की, दारात उभी आहे या प्रश्‍नाने आता भंडावून सोडले आहे. तिसरी लाट 4 जुलैपासूनच सुरू झाली आहे, असा दावा हैदराबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच भौतिकशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. बिपीन श्रीवास्तव यांनी सोमवारी केला, तर देश तिसर्‍या लाटेच्या तोंडावर उभा आहे, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्र आणि राज्य सरकारांना दिला आहे.

कोरोनाची तिसरी लाट आधीच आली हा आपला दावा स्पष्ट करण्यासाठी डॉ. श्रीवास्तव यांनी गेल्या 15 महिन्यांतील दैनंदिन रुग्णसंख्या, मृत्युदर आदी डेटांचा हवाला दिला आहे.

फेब्रुवारी 2021 च्या पहिल्या आठवड्यात कोरोना आकडेवारीची तीच परिस्थिती होती जी चालू महिन्यात 4 जुलै रोजी दिसून आली. कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी 2021 च्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झाली होती. एप्रिलमध्ये ती पीकवर गेली. तिसरी लाट सुरू झालेलीच आहे; पण लोकांनी कोरोना नियमावलीचे पालन केले नाही तर ती पीकवर येईल, असा इशारा डॉ. श्रीवास्तव यांनी दिला आहे.

'आयएमए'चा इशारा

'आयएमए' ही देशातील डॉक्टरांची प्रमुख संस्था आहे. कोरोनाची तिसरी लाट जवळ आली आहे, असे स्पष्ट शब्दांत 'आयएमए'ने केंद्र सरकार व सर्व राज्य सरकारांना कळविले आहे.

देशात पर्यटनस्थळे, विविध धार्मिक कार्यक्रम तसेच अनेक शहरे, महानगरांतून बाजारात व रस्त्यांवर होत असलेली गर्दी अत्यंत घातक ठरू शकते, असा गंभीर इशाराही आयएमएने दिला आहे.

अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा आणि सरकारने झोकून काम केल्याने देशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. आता यंत्रणा व नागरिकांनी पुन्हा निष्काळजीपणा दाखवणे देशाला परवडणारे नाही, असेही 'आयएमए'ने स्पष्ट केले आहे. कोरोनासंदर्भात जगभरात उपलब्ध असलेला डेटा व अन्य पुरावे तसेच कुठल्याही महामारीचा इतिहास पडताळून पाहिला, तर कोरोनाची तिसरी लाटही येणार म्हणजे येणार, हे दिसून येईल, असेही आयएमएने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT